नवी दिल्ली : पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल यांच्याशिवाय पती रॉबर्ट, त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया हेदेखील संसद भवनात उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर क्रीम रंगाची साडी परिधान करून संसद भवनात पोहोचलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यादरम्यान त्यांनी हातात संविधानाची प्रत धरली होती. त्यांनी हिंदीत शपथ घेतली. आई सोनिया, पती रॉबर्ट, रॉबर्टची आई, दोन्ही मुले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रंजित रंजन यांच्यासह अनेक काँग्रेस खासदारही खासदार गॅलरीत बसले होते.
शपथ घेतल्यानंतर प्रियांकाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर पहिल्या रांगेत बसलेल्या विरोधी पक्षनेत्यांना हात जोडून अभिवादन केले. सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि त्यांचे बंधू राहुल गांधी यांनीही हात जोडून त्यांचे अभिवादन स्वीकारले. शपथ घेतल्यानंतर प्रियांका विरोधी खासदारांसाठी असलेल्या चौथ्या रांगेत जाऊन बसल्या. राहुल गांधी पहिल्या रांगेत बसले होते.