Home » Blog » PSL Streaming : पीएसएलचे प्रक्षेपण भारतात बंद

PSL Streaming : पीएसएलचे प्रक्षेपण भारतात बंद

अधिकृत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
PSL Streaming

नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे भारतातील थेट प्रक्षेपण तातडीने थांबवण्यात येणार आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचा अधिकृत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म फॅनकोडने हा निर्णय जाहीर केला आहे. (PSL Streaming)

पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेचा दहावा मोसम सध्या सुरू आहे. सहा संघांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा ११ एप्रिल ते १८ मेदरम्यान रंगणार आहे. भारतात फॅनकोड या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मतर्फे या स्पर्धेतील सामन्यांचे प्रक्षेपण करण्यात येते. तथापि, पेहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे प्रक्षेपण तातडीने थांबवत असल्याचे ‘फॅनकोड’तर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आले. फॅनकोडच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रेक्षकांकडून मात्र सोशल मीडियावर याबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अनेक भारतीय युजर्सनी फॅनकोडचे या निर्णयासाठी अभिनंदन केले आहे. (PSL Streaming)

पीएसएलमध्ये गुरुवारी लाहोर क्वालांडर्स आणि पेशावर झाल्मी या संघांमध्ये सामना रंगणार आहे. फॅनकोडच्या निर्णयामुळे हा सामना, तसेच स्पर्धेतील उर्वरित सामने भारतात प्रक्षेपित होणार नाहीत. पीएसएल ही पाकिस्तानमधील अग्रगण्य टी-२० लीग स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे, भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नसल्याबाबतही बीसीसीआयने वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे. या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाककडे असतानाही बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भारताचे सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. (PSL Streaming)

हेही वाचा :
दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू
 हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

You may also like

error: Content is protected !!