मुंबई : प्रतिनिधी : विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला. विमान वाहतूकीतील मक्तेदारी धोकादायक असून ही मक्तेदारी मोडून काढा, केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan’s Attack)
इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील संकटकालीन परिस्थिती आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, डीजीसीए आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. (Prithviraj Chavan’s Attack)
विमान क्षेत्रात दोनच कंपन्यांची मक्तेदारी
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिगो चा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. हे सर्व डीजीसीए आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट आणि ढिलाईमुळे घडले. त्यांनी सांगितले की डीजीसीए ने १ जुलै २०२४ पासून लागू करायचे नियमांची अंमलबजावणी न झाल्याने मक्तेदारी वाढत गेली. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी राहिली आहे. इंडिगो ६५% आणि टाटा समूह ३०%. ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. २००४ मध्ये देशात विमान वाहतूक करणाऱ्या दहा कंपन्या होत्या, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. वार्षिक ४० कोटी प्रवाशांची हवाई वाहतूक फक्त दोन कंपन्याकडे आली तर भविष्यात ही स्थिती गंभीर होऊ शकते, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खाजगी हातात जाऊ न देता स्वतःची एक विमान कंपनी सुरू करावी, अशी मागणी केली. (Prithviraj Chavan’s Attack)
इंडिगोच्या मालकाकडून भाजपला ५६ कोटींची देणगी
कॉम्पिटिशन आयोगाला अशा मक्तेदारीला रोखण्यात पूर्ण अपयश आले असून, हा आयोग बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. इंडिगोचे दोन भाग करून दोघांचा जास्तीत जास्त ३०-३०% मार्केट शेअर ठेवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. “इंडिगोच्या मालकांनी बीजेपीला इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे ५६ कोटी रुपयांची देणगी दिली. त्याचा डीजीसीए च्या निर्णयांशी काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.
अदानीकडून पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी अदानी डिफेन्सने देशातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी केली. यामुळे या क्षेत्रात सुद्धा मक्तेदारी वाढण्याची भीती आहे. कारण काही दिवसापूर्वीचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी जाहीर केले कि, येत्या १०-१५ वर्षात देशात ३० हजार पायलटची गरज भासू शकते आणि त्यानंतर अदानी यांनी ट्रेनिंग संस्था विकत घेतली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, प्रवाशांनी दुप्पट-तिप्पट किंमतीत तिकीट घेतल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल सरकारने किमान एक हजार कोटींचा विशेष फंड तयार करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. डीजीसीएचे जबाबदार अधिकारी बडतर्फ करावेत, इंडिगोचे सीओंना तात्काळ निलंबित करावे, क्रायसिसवर १५ दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, कॉम्पिटिशन कमिटी बरखास्त बरखास्त करून नव्याने सक्षम आयोग स्थापन करावा, इंडिगोचे दोन भाग करून मक्तेदारी रोखावी, मनमोहन सिंग सरकारने प्रस्तावित केलेल्या सीएए ची रचना लागू करावी अशा मागण्याही चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केल्या.