मुंबई : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आला असून त्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
क्लिंटन, मायकल जॅक्सन, प्रिन्स अँड्यूचे वादग्रस्त फोटो
अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक शोषणातील आरोपी जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील हजारो फोटो, ईमेल्स भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री अडीच वाजता सार्वजनिक करण्यात आले. साधारण तीन लाख दस्तऐवज उघड करण्यात आले. यामध्ये स्वत: एपस्टिन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन, इंग्लंडचे माजी प्रिन्स अँड्यू , डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त फोटो आणि माहिती समोर आली आहे. हॉट टबमध्ये बिल क्लिटंन फोटोमध्ये दिसत आहेत. एपस्टीनसह मायकल जॅक्सन आणि महिलांच्या मांडीवर झोपलेले प्रिन्स अँड्यू यांची छायाचित्रे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपिस्टीनला दिलेल्या चेकचा फोटो आहे. (Modi and Hardeep Singh Puri are mentioned in the Epstein file)
भारत सरकारकडून खुलाशाची मागणी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही उल्लेख असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचा अमेरिकेतील गुन्हेगार एपस्टीनसोबत काय संबंध आहे, त्यांचे नाव त्याच्या फाईल्समध्ये कसे आले, याचा खुलासा भारत सरकारने करावा अशी मागणी केली आहे.
नरेंद्र मोदींचा २०१४ चा उल्लेख
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाइल्स बाहेर येण्याला सुरुवात झाली आहे. काल शुक्रवारी मोठ्या प्रमाणात माहिती उघड करण्यात आली आहे. सर्व फोटो आणि फाइल्स उघड होण्याला अजून वेळ लागणार आहे. त्यामधील काही ईमेल्समध्ये काही भारतीय नावे पुढे आली आहेत. यामध्ये साधारण ३५०० फाईल्स असून हा ३०० जीबी डेटा आहे. त्यामुळे या फाईल्समधील सर्व माहिती उघड होण्याला वेळ लागणार आहे. मात्र काही ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे मोदी आणि एपस्टीन यांच्यात काय संबंध आहेत, हा सवाल त्यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदींचा संदर्भ यामध्ये आला आहे. तो २०१४ चा आहे. तेव्हा जेफ्री एपस्टीनला अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात शिक्षा झालेली होती. त्यामुळे एका गुन्हेगाराशी भारताच्या पंतप्रधानांचा काय संबंध आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही यातील एका ईमेलमध्ये उल्लेख आहे. पुरी हे भारताचे न्यूयॉर्कमधील राजदूत होते. (Modi and Hardeep Singh Puri are mentioned in the Epstein file)
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारतीय नेत्यांची नावे यामध्ये आली म्हणजे ते गुन्हेगार आहेत, असे नाही. मात्र अमेरिकेतील लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील गुन्हेगारासोबत भारतातील काही नेत्यांची नावे जोडली जात आहेत, त्याचा खुलासा भारत सरकारने केला पाहिजे. (Modi and Hardeep Singh Puri are mentioned in the Epstein file)