Home » Blog » Nidhi Kulpati: निधी नावाची छोट्या पडद्यावरची कुलपती

Nidhi Kulpati: निधी नावाची छोट्या पडद्यावरची कुलपती

0 comments

विजय चोरमारे

निधी कुलपतीचं एनडीटीव्ही इंडियामधून निवृत्त झाली. एखाद्या संस्थेतून किती दिमाखात निवृत्त होता येतं, हे निधीच्या निवृत्तीनंतर जाणवलं. अडीच दशके आपल्यासोबत प्रवास करणा-या एखाद्या व्यक्तिनं मधेच प्रवास सोडून वेगळा रस्ता धरण्यासारखी आहे ही निवृत्ती. अर्थात अलीकडच्या काळात कुणी प्रवासात एवढी दीर्घ सोबत करीत नाही. आणि चुकून कुणी केली तरी वाटा वेगळ्या होताना त्यात गोडवा राहात नाही. सगळ्या रूढ गोष्टींना निधीनं फाटा दिला. निधीची निवृत्ती ही खास तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी होती. (Nidhi Kulpati)

साधारणपणे २०००-२००१ साल असावं. कोल्हापूर महापालिकेच्या पत्रकार कक्षात बसलो होतो. टीव्ही पाहताना झी न्यूजवर एक नवा, सुंदर चेहरा दिसला. बातम्या सांगताना नवखेपणा जाणवत होता. प्रवाहीपणा नव्हता. पण आत्मविश्वास होता. पडद्यावर नाव होतं – निधी कुलपती. (Nidhi Kulpati)

निधी कुलपतीचं हे पहिलं दर्शन किंवा पहिली ओळख म्हणू. निधी कुलपती हा उल्लेख आदरार्थी करायला करायला हवा. पण हिंदीतली अदब मराठीत आणता येत नाही. ते कृत्रिम वाटतं. आणि पंचवीस वर्षांच्या रोजच्या सहवासातून एक आपुलकी, आत्मियता निर्माण झाल्यामुळं या घडीला एकेरी संबोधनच योग्य वाटतं. (Nidhi Kulpati)

एनडीटीव्हीचं युग सुरू झालं. आणि बघता बघता एनडीटीव्ही इंडिया हा सवयीचा भाग बनला. टीव्हीवर कोणतं न्यूज चॅनल बघायचं, तर एनडीटीव्ही इंडिया. मराठी वृत्तवाहिन्यांचा, क्वचित हिंदी, इंग्रजी वाहिन्यांचा धावता धांडोळा घेऊन फक्त आणि फक्त एनडीटीव्ही इंडियावर जाऊन रिमोट थांबायचा.

दिबांग, अभिग्यान प्रकाश, अभिसार शर्मा ही मंडळी असायची. निवडणुकीच्या काळात प्रणय रॉय, विनोद दुआही भेटायचे. लखनौचा कमाल खान, दिल्लीतला हृदयेश जोशी हे रिपोर्टर. त्यातच नगमा, निधी कुलपती या अँकर दिसू लागल्या. काही वर्षांपूर्वी झी न्यूजवर पाहिलेला निधीचा चेहरा लक्षात होता. एनडीटीव्ही इंडियाच्या पडद्यावर निधीचं दर्शन झालं, तेव्हा `अरे झी न्यूजवर पाहिलेली हीच ती पोरगी….` अशी प्रतिक्रिया उमटली. पण इथलं निधीचं दर्शन अत्यंत प्रगल्भ आणि बोलणं प्रवाही होतं. व्यक्तिमत्त्व प्रभावी बनलं होतं. आत्मविश्वास ठासून भरलेला होता. त्याला शालीनतेची जोड होती. त्यामुळं स्वाभाविकपणे निधीचं बुलेटिन असायचं तेव्हा पडद्यावरची नजर हटायची नाही. कानात प्राण आणून बातम्या ऐकल्या जायच्या. याच सुमारास कधीतरी रवीश कि रिपोर्ट आवडीनं पाहू लागलो. अभिसार शर्मासारखा तरुण पत्रकार आंतरराष्ट्रीय प्रश्नांची उकल सहजपणे करून दाखवत होता. दिबांगच्या सौम्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वेगळाच होता. (Nidhi Kulpati)

`एनडीटीव्ही इंडिया` हा व्यक्तिशः माझ्या जगण्याचा भाग बनला होता. त्यावरच्या चर्चा मला पत्रकार म्हणू व्यक्तिशः घडवत राहिल्या. त्याअर्थानं माझ्या पत्रकार म्हणून जडणघडणीत एनडीटीव्हीचा महत्त्वाचा वाटा असल्याचं मान्य करावं लागतं. माझं राष्ट्रीय राजकारणाबद्दलचं आकलन जे काही असेल त्यात एनडीटीव्ही इंडियाची भूमिका महत्त्वाची आहे, हे सांगताना जराही संकोच वाटत नाही.

पुढं एनडीटीव्हीशी वेगळ्या कारणांनी संपर्क वाढू लागला. प्रियदर्शन नामक कवीच्या कविता इंटरनेटवर आढळल्या. समानधर्मा कवीच्या कवितांनी भारावून गेलो. त्यांचा मराठी अनुवाद करायचं ठरवलं. त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनीही उत्साही प्रतिसाद दिला. ते गाझियाबादमध्ये राहात होते, एवढंच माहित होतं. प्रत्यक्ष संपर्क झाल्यावर कळलं की, ते एनडीटीव्ही इंडियामध्ये सिनिअर एडिटर आहेत. मग दिल्लीला गेलं की त्यांच्याकडं एनडीटीव्हीच्या कार्यालयात जाणं होऊ लागलं. तिथं असेच एकदा जिना उतरताना रवीश कुमार भेटले. प्रियदर्शन यांनी ओळख करून दिली आणि त्यांच्या कवितांचा मी मराठी अनुवाद करीत असल्याचं सांगितलं. (Nidhi Kulpati)

मुलगी अक्षरानं इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेचा मार्ग निवडायचं ठरवलं तेव्हा एनडीटीव्ही मीडिया इन्स्टिट्यूटचा पर्याय समोर आला. तिनं रितसर अर्ज करून, मुलाखत देऊन तिथं प्रवेश घेतला. अक्षरा तिथं असताना एकदा तिला एनडीटीव्हीच्या कार्यालयात भेटायला गेलो होतो. रात्रीची वेळ होती. प्रियदर्शन यांनाही भेटलो. गप्पा मारत ऑफिसच्या बाहेर टपरीवर चहा घ्यायला आलो, तर तिथं अरुणा रॉय भेटल्या. डिबेट शोसाठी आल्या होत्या. त्यांना सोडायला गेस्ट कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी पाहणारे मुन्ने भारती आले होते. चहा घेताघेता गप्पा सुरू झाल्या. दरम्यान अरुणा रॉय निघून गेल्या. त्यांना निरोप दिल्यावर मुन्ने भारती मला म्हणाले, `अरे भाई, महाराष्ट्र के बारे में कोई चर्चा होती तो हमें गेस्ट ढूंढने में दिक्कत होती है. आप एनडीटीव्ही पर चर्चा के लिए आ सकते हो क्या?`

(आ सकते हो क्या? मनात म्हटलं, एका पायावर दौडत आ सकते है) म्हटलं जरूर. मुन्ने भारती यांनी माझा नंबर घेतला.

मी तेव्हापासून एनडीटीव्हीच्या फोनची वाट पाहू लागलो. टीव्हीच्या दुनियेतलं अत्यंत आवडता आणि त्या काळातला सर्वश्रेष्ठ मंच होता. तिथं जाण्यासाठी उत्सुक होतोच.

काही आठवड्यांनी दुपारी मुन्ने भारती यांचा फोन आला. मराठा आरक्षणासंदर्भातील काहीतरी निर्णय होता. नेमका त्यावेळी दिल्लीला जाण्यासाठी विमानतळाकडं निघालो होतो. त्या चर्चेत भाग घेणं शक्य नव्हतं.

म्हणजे ज्या संधीची वाट पाहत होतो ती आली होती आणि मी ती घेण्यासाठी उपलब्ध नव्हतो.

पुढे आणखी काही आठवडे गेले. 

पुन्हा एकदा महाराष्ट्राशी संबंधित काही विषय ठरला होता त्यासाठी फोन आला. एनडीटीव्हीची गाडीही घ्यायला आली होती. निघणार एवढ्यात फोन आला की, `जेएनयु मे कुछ गडबड हुआ है, महाराष्ट्र का डिबेट कॅन्सल हुआ है…` 

दरम्यान २०१९ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि मग महाराष्ट्रावरील चर्चा होऊ लागल्या. NDTV च्या इंडियाबुल्स टॉवरमधल्या ऑफिसात नियमित जाणे सुरू झाले. कोविडच्या आधीचा काळ असल्यामुळे ऑनलाइन चर्चा सुरू झाल्या नव्हत्या. स्टुडिओतून व्हायच्या. तेव्हा वेगवेगळे अँकर असायचे. नगमा, संकेत उपाध्याय, मनोरंजन भारती, अदिती राजपूत वगैरे. 

हळुहळू एनडीटीव्ही इंडियाच्या चर्चेत रुळलो होतो. 

एकदा सायंकाळी सहा वाजता फोन आला, सात बजे शो कर रहे है…

खरंतर चार वाजताच्या चर्चेत सहभागी होऊन परत आलो होतो. तेवढ्यात पुन्हा सातची चर्चा. वाजले होते सहा. म्हणजे पंधरा मिनिटात निघायला हवे होते. हातात काम होते त्यामुळं `शक्य नाही` म्हणून सांगत होतो. तिकडून मुन्ने भारती विनंती करत होते. `देखो ना…प्लीज..` मी सहज विचारलं, `अँकर कोण आहे?` म्हणाले,`निधी कुलपती`. म्हटलं, `आ रहा हुं`. 

तोपर्यंत आपल्या आवडत्या अँकरसोबत कधी चर्चेत सहभागी होण्याचा योग आला नव्हता. निधीसोबतचा पहिलाच कार्यक्रम होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत मला चुकवायचा नव्हता. हातातलं काम वेगानं आवरलं. दरम्यान त्यांनी बुक केलेली गाडी तयारच होती.

तारीख आठवत नाही. पण २०१९च्या निवडणुकीचा काळ होता. चर्चा खूप चांगली झाली. चर्चा चांगली होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे आपली विषयाची पूर्ण तयारी. विषयाची सखोल माहिती असेल तर आत्मविश्वास असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अँकर. अँकरला सगळंच माहित असतं. पाहुण्याकडून जे वदवून घ्यायचं ते अँकरही सांगू शकत असतो. परंतु चांगला अँकर कधी आपलं ज्ञान पाजळत नाही. सहभागी व्यक्तिची चर्चेतली नेमकी भूमिका काय हे लक्षात घेऊन प्रश्न विचारत असतो. टीव्हीच्या चर्चेत निखिल वागळे यांच्यासमोर चर्चेला बसताना दडपण असायचं, तसा आत्मविश्वासही असायचा. स्वतः अपग्रेड झाल्यासारखं वाटायचं. ते नेमके प्रश्न विचारायचे. बोलणं पूर्ण होऊ द्यायचे. मधेच तोडायचे नाहीत. निधीसोबतच्या पहिल्या चर्चेतला अनुभव असाच आनंददायक होता. नेमके प्रश्न आणि बोलणे पूर्ण करण्याची संधी. समृद्ध करणारा अनुभव होता. नंतरच्या काळात अनेकदा असा अनुभव घेतला. संकेत उपाध्याय यांच्यासोबतही अनेक चर्चांमध्ये सहभागी झालो, तेव्हाही असाच अनुभव आला. संकेत उपाध्याय एनडीटीव्ही सोडून त्यांनी `रेड माईक` सुरू केले. तिथेही महाराष्ट्राचा काही विषय असेल तर आवर्जून चर्चेसाठी बोलावतात. (Nidhi Kulpati)

गेल्या सहा वर्षांत एनडीटीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. एरव्ही हिंदी वाहिन्यांवर महाराष्ट्रातल्या विषयांना फारसं स्थान नसायचं. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान वगैरे विषयच असायचे. परंतु २०१९ नंतर महाराष्ट्रातल्या घडामोडी वाढल्या, तशा चर्चाही वाढल्या. यातल्या बहुतांश चर्चांमध्ये सहभागी झालो.

निधीसोबतही खूप चर्चा केल्या. संकेत उपाध्याय, निधी कुलपती, मनोरंजन भारती आदींसोबत चांगले सूर जुळले. डिबेट नसेल पण, महाराष्ट्राचा काही विषय असेल तर माहिती घेण्यासाठी ही मंडळी अधुनमधून फोन करू लागली. चांगल्या पत्रकाराचं लक्षण हे असतं की आपल्याला ज्या विषयातील तपशील माहित नसतो, तो इतरांकडून जाणून घेणे. त्यात कमीपणा नसतो. अनेकदा आयत्या वेळी चर्चेला बोलावल्यावर मीही काही पत्रकार मित्रांकडून तपशील जाणून घेत असतो. एनडीटीव्हीमधली ही मंडळी फोन करायचीत. निधीनेही एक-दोनवेळा असाच फोन करून माहिती घेतली होती.

एकदा सहा वाजता एका दुस-या वाहिनीसाठी वेळ दिला होता. त्यांचा तो कार्यक्रम दोन तास चालणार होता. निवडणूक सर्व्हेक्षणासंदर्भातला कार्यक्रम होता. दरम्यान साडेपाच वाजता एनडीटीव्हीचा फोन आला. सहाला त्यांचा कार्यक्रम होता. गेस्ट को-ऑर्डिनेटर बोलत होता. त्याला मी सांगत होतो, `मला शक्य नाही कारण सहा वाजता दुसरीकडे वेळ दिलाय`. हे सांगत असताना त्यानं, `निधीजीसे बात कीजिए` म्हणत फोन निधीकडं दिला. ज्या विषयावर चर्चा होती, त्यासंदर्भातील काही माहिती त्यांनी विचारून घेतली. म्हणाल्या, `तुम्ही दुसरीकडं वेळ दिलाय ठीक आहे. पण तुम्ही असता चर्चेत तर बरं झालं असतं. मलाही कम्फर्टेबल वाटतं तुम्ही असल्यावर…`

बोलण्यात इतकी अदब होती की, मी विचार बदलला.

मी विचारलं, `आपला विषय किती वाजेपर्यंत चालेल?` म्हणाल्या, `सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत चालेल`. म्हटलं, `ठीक आहे, येतो मी`. नाहीतर दुसरीकडं दिलेला वेळ दोन तासांचा आहे, त्यांच्याकडून मी वीस मिनिटे सवलत घेऊ शकतो. त्यानुसार मी तिकडं सांगितलं, की वीस मिनिटे उशिरा जॉईन होईन. आणि एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात सहभागी झालो.

प्रत्यक्ष कधी भेट झाली नसतानाही एक विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं. (Nidhi Kulpati)

निधीचा एनडीटीव्हीचा प्रवास हा तिचा एकटीचा नव्हता, तर देशभरातल्या लाखो दर्शकांसोबतचा प्रवास होता.

निधीच्या निवृत्तीनिमित्त एक गोष्ट जाणवली. हिंदी वृत्तवाहिन्यांची, तिथल्या अँकर्सची एवढी चर्चा सोशल मीडियावर सतत होत असते. यात निधीची चर्चा कधीच झाली नाही. म्हणजे इतकं सगळं वाईट असताना हे चांगलं आहे, म्हणूनही कधी चर्चा झाली नाही. मंदपणे तेवणा-या समईचं तसंच असतं. आग लागली तर चर्चा होत असते. भडका उडाला तर चर्चा होत असते, पण अंधारात मंदपणे तेवणारी समई तेवढी दखलपात्र नसते. अचानक विझून गेल्यावर अंधारात तिचं अस्तित्त्व जाणवतं. निधीच्या बाबतीत तसंच म्हणता येईल. निधी होती तेव्हा ती तिचा अवकाश व्यापून होती. तिचा ऑरा जबरदस्त होता. तो तिनं आपल्या वर्तनव्यवहारानं निर्माण केलेला होता. एनडीटीव्ही म्हणजे केवळ रवीश कुमार असं मानणारा एक वर्ग होता. तो सोशल मीडियाच्या प्रभावाखालचा वर्ग होता. एनडीटीव्ही इंडिया म्हणून जी खानदानी वृत्तवाहिनी होती, त्यात अनिंद्यो चक्रवर्ती, सुनील सैनी, प्रियदर्शन यांच्यासारखी पडद्यामागची मंडळी होती. रवीश पडद्यावरचा हिरो होता आणि एनडीटीव्हीनं अवकाश दिल्यामुळं तो तयार झाला होता, हे नाकारता येत नाही. त्याचवेळी संकेत उपाध्याय, निधी कुलपती, नगमा, मनोरंजन भारती, हृदयेश जोशी, कमाल खान इत्यादी मंडळींनी एनडीटीव्हीचा रुबाब टिकवून ठेवला होता.

एनडीटीव्ही अदानींनी घेतल्यानंतर आणि रवीश कुमार सोडून गेल्यानंतरही सुसह्य म्हणता येईल अशी वाहिनी एनडीटीव्ही इंडियाच होती. काहीप्रमाणात आजही आहे. त्यातही दर्शकांना एनडीटीव्हीशी बांधून ठेवणारा निधी कुलपती हा महत्त्वाचा धागा होता.

निधीच्या निवृत्त होण्यामुळं तो धागा तुटला आहे. (Nidhi Kulpati)

गेल्या तीन दशकांत टीव्हीच्या पडद्यावर निधी कुलपतीएवढं सुंदर, शालीन आणि प्रगल्भ दुसरं काही नव्हतं, हे कुणालाही मान्य करावं लागेल! (Nidhi Kulpati)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00