Home » Blog » Jotiba Mandir plan : जोतिबा मंदिर आराखड्यासाठी २६० कोटी

Jotiba Mandir plan : जोतिबा मंदिर आराखड्यासाठी २६० कोटी

by प्रतिनिधी
0 comments
Jotiba Mandir plan

मुंबई  : प्रतिनिधी :  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिराच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी २५९ कोटी ५९ लाख रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय आज बुधवारी  नियोजन विभागाने जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (Jotiba Mandir plan)

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जोतिबा मंदिर विकास आराखड्याअंतर्गत जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटांचे संवर्धन व सुशोभीकरण करणे, डोंगर कड्यांचे संवर्धन करणे, देवस्थान समितीचे नवीन कार्यालय बांधणे, दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे, नवे तळे परिसर विकास करणे, केदार विजय गार्डन निर्मिती करणे, यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, कर्पूर तलाव, चव्हाण तलाव, मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणे, अंगारकर वाडा व बाव संवर्धन करणे, पार्कंग व्यवस्था करणे, पाणपोई व शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे. या कामांवर पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी ८१.६० कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. (Jotiba Mandir plan)

या प्रकल्पाची अंमलबजावणी ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्त्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्त्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात येणार असून या समित्यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील. (Jotiba Mandir plan)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00