कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी तसेच या आरोग्य सेवांवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब व यलो फीवर लसीकरण सेंटरच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची प्रमुख उपस्थिती होती. (Inauguration of a vaccination center at Kasaba Bawada Service Hospital)
कोल्हापूर मेडिकल हब विकसित करण्यासाठी सुविधा
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाच्या वतीने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सेवा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन आणि अत्याधुनिक लॅब अशा विविध सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. यासोबतच कॅन्सर निदान आणि उपचार सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. येत्या काही महिन्यांत ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग आणि कॅथलॅब सुरु करण्याचे नियोजन आहे.
शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार
कोल्हापुरात यलो फिव्हर लसीकरणाची सुविधाही सुरु करण्यात आली असून, आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मित्रा संस्थेच्या सहकार्याने शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. तसेच २०० बेडचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० बेडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पालकमंत्री श्री आबिटकर यांनी सांगितले.यावेळी खासदार शाहू छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम यांनी मनोगत व्यक्त केले. (Inauguration of a vaccination center at Kasaba Bawada Service Hospital)
सेवा रुग्णालयाला सव्वाशे वर्षाहून अधिक वर्षाचा इतिहास
सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सेवा रुग्णालयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या रुग्णालयाला पूर्व द व्हिक्टोरिया डायमंड जुबली हॉस्पिटल या नावाने संबोधले जात होते. या इमारतीची पायाभरणी १८जून १८९७ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाली होती. सध्या रुग्णालयात बालरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भुलतज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्य चिकित्सक, भुलतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी आदी कार्यरत आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर, महानगरपालिका महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एल. कदम, कृष्णा डायग्नोस्टिकचे कार्यकारी अध्यक्ष आदर्श कर्नावत तसेच नगरसेवक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले. (Inauguration of a vaccination center at Kasaba Bawada Service Hospital)
