कोल्हापूर; प्रतिनिधी : आज (दि.७) अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच शारदीय नवरात्रातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री सरस्वती देवी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. श्री सरस्वती ही सत्वगुणप्रधान देवी आहे. ती ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला, संगीत, शिक्षण यांची अधिष्ठात्री देवता आहे. ऋग्वेदामध्ये सरस्वती मातेस अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. (Navratri Ustav 2024)
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
याप्रमाणे हा श्री सरस्वती देवीचे ध्यान, स्तुती तसेच प्रार्थनेचा सुप्रसिद्ध श्लोक आहे. याचा अर्थ, जी कुंदपुष्प, चंद्र आणि हिमाच्या मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ आहे, जिने शुभ्रवस्त्र परिधान केले आहे, जिच्या हातांत श्रेष्ठ अशी वीणा आहे, जी श्वेत कमलासनावर विराजमान आहे, जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे, अशी ती संपूर्ण जडता (बुद्धिमांद्य) आणि अंजान यांचा समूळ नाश करणारी देवी सरस्वती माझे रक्षण करो.
चतुर्भुजा सरस्वतीच्या हातांमध्ये अक्षमाला, वीणा व पुस्तक शोभायमान आहेत. श्री सरस्वती देवीचे वाहन हंस आहे. परमपूज्य श्री शंकराचार्यांच्या मठांमध्ये प्रामुख्याने श्री शारदांबेचे पूजन केले जाते. शारदांबा म्हणजे देवी सरस्वतीच होय. श्री सरस्वती देवीची प्रसिद्ध मंदिरे वैष्णोदेवी (काश्मीर), शृंगेरी (कर्नाटक), बासर (तेलंगणा) येथे आहेत. (Navratri Ustav 2024)
धार्मिक पूजेच्या प्रारंभी गणेश, सरस्वती व गुरु यांना वंदन केले जाते. आपल्या प्रासादिक संत वाङ्मयांत संतांनी ग्रंथारंभी गणेश, शारदा, सद्गुरू यांचे स्मरण-वंदन केले आहे. भारतामध्ये विद्यालयांमधून बालवयात विद्यारंभी श्री सरस्वतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. श्री सरस्वती देवी सर्वांना जान व सदबुद्धी देवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना !
ही पूजा विद्याधर मुनिश्वर, मयूर मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
- जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर?
- सांगलीचे खा. विशाल पाटील-संजयकाका पाटील यांच्यात हमरीतुमरी
- ‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार