संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर निघून गेले. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर त्यांचे तिथे भव्य स्वागत करण्यात आले. बिहू नृत्य, पारंपरिक ढोल नगारे आणि ‘मोदी मोदी…’ च्या घोषणांनी लंडनच्या रस्त्यांवर उत्साह संचारला, असे यासंदर्भातील बातम्यांमध्ये म्हटले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच २०१४ नंतर असे स्वागताचे इव्हेंट मोठ्या प्रमाणावर होऊ लागले, हे लोक उत्स्फूर्त येत असतात की भाडोत्री असतात? (Modi’s foreign tour)
-डॉ. विजय चोरमारे
पंतप्रधान मोदी यांच्या लंडन दौऱ्यातील स्वागताच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यामध्ये लंडन विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत भारतीय संस्कृतीची झलक दिसून आली, असे म्हटले आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये, हातात तिरंगा घेऊन लोक पंतप्रधानांचे स्वागत करीत होते. ऑपरेशन सिंदूरबद्दल लोकांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले, असेही यासंदर्भातील वृत्तांतामध्ये म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरची वस्तुस्थिती काय आहे, त्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले आहे हे सगळे जगजाहीर असताना ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या भारतीयांना त्याची कानोकान खबर नसावी, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. (Modi’s foreign tour)
पंतप्रधान मोदी यांनीही ‘एक्स’ या समाजमाध्यमावर, भारतीय लोकांनी केलेल्या उत्साही स्वागताने भारावून गेलो आहे. भारताच्या प्रगतीबाबतच्या त्यांच्या भावना उत्साहवर्धक आहेत, असे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांचे परदेशात होणारे भव्य स्वागत सोहळे, त्यासाठी होणारी गर्दी, `मोदी- मोदी` अशा दिल्या जाणाऱ्या घोषणा २०१४ पासून पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे भारतीय पंतप्रधानांचे विदेशातले जल्लोषी स्वागतसोहळे आधीच्या पंतप्रधानांच्या काळात पाहायला मिळत नव्हते. त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढल्याचे चित्र गोदी मीडियाकडून निर्माण केले जाऊ लागले. मोदींचे थोरपण ठसवण्याचे प्रयत्न नियोजनबद्धरितीने केले जाऊ लागले. सामान्य लोकांनाही तसेच वाटू लागले. कारण त्याआधी अशा प्रकारे भारतीय पंतप्रधानांचे स्वागत होत नव्हते. या स्वागतामुळे मोदी हे आजवरचे सगळ्यात थोर पंतप्रधान असल्याचे भोळ्याभाबड्या भारतीय जनतेलाही वाटू लागले.
परंतु या स्वागतामागचे राजकारण आणि नियोजन समजून घेतले तर त्यातून भारतातील करदात्यांचे पैसे कसे उधळले जात आहेत, याची कल्पना येऊ शकेल.
२०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांचे भूतानपासून आणि कुवेतपर्यंत आणि युक्रेनपासून आणि अमेरिकेपर्यंत वादळासारखे दौरे सतत बातम्यांमध्ये झळकत राहिले. माहिती अधिकार कार्यकर्ते कमोडोर लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जांमधून काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. ज्या पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा फुग्याला टाचणी लावणाऱ्या आहेत. (Modi’s foreign tour)
मोदींच्या रशियामधील दोन दौऱ्यांवर १५ कोटींपेक्षा अधिक खर्च केला, तर अबू धाबीच्या दौऱ्यावर जवळपास ५ कोटी रुपये खर्च झाले. पंतप्रधानांच्या दौऱ्यांचा संपूर्ण खर्च समोर आला नाही, कारण अनेक दूतावासांनी अर्जांना उत्तर दिले नाही. ते अर्ज त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून दिले. (Modi’s foreign tour)
कमोडोर बत्रा यांनी त्यांच्या RTI अर्जामध्ये प्रत्येक दौऱ्याचा एकूण खर्च, निवास, वाहतूक, कार्यक्रम यांसारख्या विविध बाबींच्या खर्चाचे तपशील आणि दौऱ्यांसाठी कोणतीही बाह्य संस्था प्रायोजक होती का, याची माहिती विचारली होती. मोदी ज्या देशांमध्ये गेले त्या सर्व देशांतील भारतीय दूतावासांना RTI अर्ज पाठवले. मात्र बत्रा यांना– मॉस्को आणि अबू धाबी या दोन ठिकाणांहूनच उत्तर मिळाले आहे. बहुतेक दूतावासांनी माझे RTI अर्ज थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे.
आपण ब्रिटन दौऱ्यातील पंतप्रधानांचे जल्लोषी स्वागत पाहिले. ब्रिटनमधल्या भारतीय लोकांनी जणून उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन स्वागत केले असा भास त्यामुळे होतो. गेल्या अकरा वर्षांतील अनेक दौऱ्यांमध्ये जे स्वागत झाले त्यावेळीही अनेकांना तसेच वाटले. परंतु हे स्वागत सोहळे उत्स्फूर्तपणे झालेले नाहीत. तिथल्या तिथल्या दूतावासांनी कोट्यवधी रुपये खर्च करून भाडोत्री लोक आणून हे स्वागत सोहळे केल्याचे यासंदर्भातील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. (Modi’s foreign tour)
भारतीय दूतावास अबू धाबीने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये मोदी यांच्या युएई दौऱ्यावर ४.९५ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च “कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स” या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली दाखवण्यात आला आहे.
मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या उत्तरानुसार, जुलैमध्ये मॉस्को आणि ऑक्टोबरमध्ये कझान येथे झालेल्या मोदींच्या दोन रशिया दौऱ्यांचा एकूण खर्च १५ कोटींपेक्षा अधिक होता.
- रशियातील मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने जुलै २०२४च्या मॉस्को दौऱ्याच्या खर्चाचा तपशील दिला आहे. त्यामध्ये
- हॉटेल व्यवस्था – १ कोटी ८१ लाख ६९ हजार ३८८
- डेली अलौंन्स – २० लाख ८१ हजार ३०३
- कम्युनिटी रिसेप्शन – १ कोटी ८७ लाख ९७ हजार २५९
- वाहतूक व्यवस्था – ५९ लाख ६ हजार ३१
- इतर खर्च – ६२ लाख ५६ हजार १२९
- एकूण – ५ कोटी १२ लाख १० हजार ११०
…
- ऑक्टोबर २०२४ मधील कझान दौऱ्याच्या खर्चाचा तपशील असा आहे :
- हॉटेल व्यवस्था – १ कोटी ६२ लाख ७९ हजार ६५५
- डेली अलौन्स – २५ लाख ६७ हजार १५८
- वाहतूक व्यवस्था – एक कोटी ७९ लाख८५ हजार १००
- इतर – ६ कोटी ५६ लाख २७ हजार २५८
- एकूण – १० कोटी २४ लाख ५९ हजार १७१.
मॉस्को दौऱ्यामध्ये `कम्युनिटी रिसेप्शनवर` एक कोटी ८७ लाख ९७ हजार २५९ रुपयांचा खर्च दाखवला आहे. तो खर्च म्हणजेच स्वागतासाठी जमवलेल्या लोकांवरचा खर्च असल्याचे मानले जाते. कमोडोर बत्रा यांनी म्हटले आहे की, ज्या देशात ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते तो देश पंतप्रधानांच्या स्वागतावर एक कोटी ८८ लाख रुपये खर्च करतो. (Modi’s foreign tour)
कझानच्या दौऱ्यामध्ये तो तपशील दिलेला नाही. परंतु मॉस्को दौऱ्याचा खर्च पाच कोटी तर कझान दौऱ्याचा खर्च दहा कोटी आहे. इथे इतर खर्चामध्ये सहा कोटी ५६ लाख २७ हजार २५८ रुपयांचा उल्लेख आहे. इतर म्हणजे काय याचा तपशील दिलेला नाही. त्यामध्येही स्वागतासाठी जमवलेल्या भाडोत्री लोकांचा, ढोल नगा-यांच्या खर्चाचा समावेश असावा, असे मानले जाते.
मोदींचे स्वागत सोहळे म्हणजे पैसे खर्च करून केलेले इव्हेंट असतात, असे या माहितीवरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
कमोडोर बत्रा यांनी म्हटले आहे की, “करदात्यांचा पैसा कसा खर्च होतो याचे उत्तरदायित्व सरकारवर असते. अनेक दूतावास २०१५ मध्ये याच प्रकारची माहिती RTI अंतर्गत सहज देत होते, पण आता तीच माहिती देण्यास नकार देत आहेत, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.
मोदींनी कितीही प्रचार केला तरी त्यांनी आतापर्यंत केलेल्या १५१ देशांच्या दौऱ्यातून भारताला त्याचे डिप्लोमसी रिटर्न्स काहीही मिळालेले नसल्याचे ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवरून दिसून आले नाही. एकही देश भारताच्या समर्थनार्थ पुढे आला नाही. अशावेळी पंतप्रधानांनी स्वतः प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी खासदारांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली आणि स्वतः देशात रोड शो करीत राहिले. दरम्यान याच महिन्यात पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले, हेही दुर्लक्षित करून चालत नाही.
आधीचे पंतप्रधान एअऱ इंडियाच्या विशेष विमानाने परदेश दौरे करीत होते. देशातील पत्रकारांना दौऱ्यावर नेत होते. मोदींनी आठ हजार कोटींचे विमान खरेदी केले. त्यात सुरक्षा यंत्रणेसाठी १६०० कोटी रुपये खर्च केले. शिवाय त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत नेणे बंद केले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकालात ९३ देशांचे दौरे केले. इंदिरा गांधी यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात ११३ देशांचे दौरे केले. मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळातील साडेचार वर्षांतच ९२ देशांचे दौरे करून विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी दीडशेहून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात ४८ देशांना भेटी दिल्या.
गेल्या तीन वर्षांत पंतप्रधानांनी ३४ देशांचे दौरे केले असून त्यावर २५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मार्चमध्ये सरकारकडूनच राज्यसभेत ही माहिती देण्यात आली. आहे. गेल्या तीन वर्षांत ३८ देशांचे दौरे केले आहेत. २०२२ मध्ये आठ देश, २०२३ मध्ये दहा देश आणि २०२४ मध्ये १६ देशांचे दौरे केले आहेत. तर मोदींनी इतके परदेश दौरे केले तिथल्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांना मिठ्या मारून जवळीक दाखवली. परंतु कसोटीच्या वेळी त्यापैकी एकही देश भारताच्या समर्थनार्थ पुढे आला नाही. मग मोदींच्या परदेश दौऱ्यांनी परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढवली म्हणजे नेमके काय केले, याचे उत्तर मिळत नाही.