नवी दिल्ली : दक्षिण कोरियाच्या गोलरक्षकाच्या चुकीचा फायदा घेत मेक्सिकोने गोल केला. एस्टाडियो अक्रॉन येथील मैदानावर उपस्थित यजमान मेक्सिकोच्या समर्थकांनी जल्लोष केला. पूर्णवेळेत मेक्सिकोने दक्षिण कोरियावर १-० असा विजय मिळवला. ‘अ’ गटात त्यांनी सलग दोन विजय मिळवत सहा गुणांची कमाई करत ३२ संघाच्या बाद फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून यजमान मेक्सिकोने मान मिळवला. पहिल्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आहे. (Mexico advances to the knockout stage)
पूर्वार्धातील खेळावर दक्षिण कोरियाची छाप होती. त्यांनी चेंडू सतत स्वत:जवळ ठेवला होता. उत्तरार्धात पाचव्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या गोलरक्षक किम सेऊंग ग्यू ची चूक महाग पडली. हवेत असलेला चेंडू त्याने पकडला पण त्याची धडक त्यांच्याच संघातील बचाव खेळाडू ली गी ह्युकशी बसली. आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. जमिनीवर पडलेला चेंडू छातीपर्यंत उंचीपर्यंत उडालेला असताना मेक्सिकोचा मिडफिल्डर लुईस रोमोने चपळाईने चेंडू जाळ्यात मारला. हाच गोल निर्णायक ठरला.
सामन्याच्या शेवटच्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी कोरियाने जोरदार प्रयत्न केले. ८७ व्या मिनिटाला गोल नोंदवून बरोबरी साधण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. बदली खेळाडू चो गे संगने मारलेला हेडर मेक्सिकन गोलकिपर राऊल रँगलने अडवला. त्यानंतर चेंडू रिबाँड झाला. त्यावर यांग ह्यून जूनचा फटका गोलरक्षकाने चपळाईने रोखत संघावरील संकट टाळले.
दोन्ही सामन्यात विजय मिळवत मेक्सिको संघाने सहा गुणांची कमाई केली. अ गटात त्यांनी अव्वल स्थान पटकावले. राऊंड ३२ मध्ये प्रवेश करणारा मेक्सिको पहिला संघ ठरला आहे. Mexico advances to the knockout stage)
कॅनडाने उडवला कतारचा धुव्वा
यजमान कॅनडाने कतारचा ६-० असा धुव्वा उडवला. जोनाथन डेव्हिडने हॅटट्रिक साधली. अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीनंतर हॅटट्रीक नोंदवला जोनाथन दुसरा खेळाडू ठरला आहे. साईल लॅरिन आणि नॅथन सलिबा यांनीही गोल केले. सहावा गोल स्वयंगोल झाला. कॅनडा ब गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात कॅनडाला मिडफिल्डर इस्माईल कोने याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला स्ट्रेचरवरुन बाहेर नेण्यात आले. कतारचा मिडफिल्डर असिम मदिबोने मारलेल्या धक्क्यामुळे कोने खाली पडला आणि त्याला दुखापत झाली. पंचानी मदिबानीला यलो कार्ड दाखवले. पण व्हिडिओ रिव्ह्यूनंतर त्याला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
झेकिया-दक्षिण अफ्रिका सामना बरोबरीत
अटलांटा येथील मर्सिडीज बेझ स्टेडियमवर झेकिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना १-१ बरोबरीत राहिला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अलेक्झांडर सोयकाने वेगवान फटक्याद्वारे गोल केला. जमिनीलगत मारलेला त्याचा फटका प्रेक्षणीय होता. २०२६ च्या विश्वचषकातील सर्वात वेगवान गेल होता. परतफेड करण्यासाठी अफ्रिकेला सुदैवाने ८१ व्या मिनिटापर्यंत वाट बघावी लागली. थापेला मासेकाचा वेगवान फटका झेकिया मिडफिल्डर पावेल सुलचच्या हातात लागला. पंचांनी दक्षिण अफ्रिकेला पेनल्टी बहाल केली. मोकोएनाने अचूक पेनल्टी मारत सामना १-१ बरोबरीत आणला. Mexico advances to the knockout stage)