कोलंबो : वृत्तसंस्था : श्रीलंकेत अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील ‘एनपीपी’ आघाडीला संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात ‘एनपीपी’ने श्रीलंकेच्या संसदेत १९६ पैकी १४१ जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान, सजिथ प्रेमदासाचा समगी जना बालवेगया (एसजेबी) ३५ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, मतमोजणीत ‘एनपीपी’ने ने राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६२ टक्के किंवा ६८.६३ लाखांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. प्रेमदासाचा मुख्य विरोधी पक्ष ‘समगी जना बालवेगया’ला सुमारे १८ टक्के मते मिळाली, तर माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे समर्थित ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट’ ला केवळ ४.५ टक्के मते मिळाली. अनुरा दिसानायके यांचा श्रीलंकेत लवकर निवडणुका घेण्याचा निर्णय यशस्वी झाला. त्यांच्या पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा संसदीय निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या इतिहासात डाव्या पक्षाची सत्ता येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनुरा हे चीनच्या जवळचे मानले जातात.
श्रीलंकेत २२५ जागांच्या संसदेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी ११३ जागा जिंकाव्या लागतात. यापैकी १९६ जागांवर मतदान घेतले जाते. उर्वरित २९ जागांसाठी उमेदवारांची निवड राष्ट्रीय यादीद्वारे केली जाते. राष्ट्रीय यादी प्रक्रियेअंतर्गत, श्रीलंकेतील सर्व राजकीय पक्ष किंवा स्वतंत्र गटांद्वारे काही उमेदवारांच्या नावांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते. नंतर प्रत्येक पक्षाच्या यादीतून उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात निवडले जातात. गेल्या सप्टेंबरमध्येच ४२.३१ टक्के मते मिळवून दिसानायके यांची अध्यक्षपदी निवड झाली; परंतु त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी संसद बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले.
दुरुस्त्यांचा मार्ग मोकळा
अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी दिसानायके यांनी देशाच्या आर्थिक आणि राजकीय संकटासाठी या व्यवस्थेला जबाबदार धरले होते. रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारच्या काळात सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि जागतिक नाणेनिधीकडून कर्ज घेण्याचा करार संपुष्टात आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हे सर्व बदल अंमलात आणण्यासाठी त्यांना संसदेकडून कायदे आणि घटनादुरुस्तीची गरज होती, त्यामुळे आता संसदीय निवडणुकीत अनुरा यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे लवकरच श्रीलंकेत काही मोठे बदल पाहायला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.