-संजय सोनवणी
चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रू बनवण्यात मोलाचा हातभार लावला. एवढेच नाही तर पर्यावरणाचे संतुलन साधायलाही हातभार लावला. पण या चर्म-वस्तूंचा सर्रास उपयोग करणाऱ्यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले व ज्यांनी (चर्मकारांनी) त्यापासुन आपल्या कलेचे दर्शन घडवत मानवोपयोगी वस्तू बनवल्या, त्यांना मात्र अस्पृश्य ठरवले.
जेव्हा जवळपास दीड लाख वर्षांपूर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, नग्न रहात होता, त्या काळात मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासून रक्षण करण्यासाठी (लज्जा रक्षणासाठी नव्हे… कारण तो विचार तेंव्हा मानवाला शिवलाही नव्हता.) पांघरण्यासाठी व कृत्रिम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरू शकतो हे लक्षात आल्यावर मानवाने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी जपायला सुरुवात केली. परंतु वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावून कातडे टिकावू कसे करता येईल यासाठी शोध सुरू केला. सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम मानव जनावराचीच चरबी चोळून कातड्याला मऊ व टिकावू ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावू कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावू लागला व शिकार कमी झाल्याने कातड्याची मुबलकता कमी झाली तेव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले.
सरासरी इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपूर्वी, प्रयोग करत त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधून काढली…व ती म्हणजे कातडी कमावण्याची कला. भारतात बाभूळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ व अन्य तेलादी रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापूर्वी सातेक हजार वर्षांपूर्वीच शोधण्यात आली. ती सर्व प्रचारित होऊन ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. (युरोपात मात्र ओक वृक्षाची साल कातडी कमावण्यासाठी वापरली जाई व त्यापासून कमावलेले कातडे तेवढे टिकावूही नसे.) प्रत्येक प्रकारच्या जनावराची कातडी कमावण्याची पद्धत वेगळी. त्या सर्व शोधल्या गेल्या. कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रृंखला असलेले किचकट व कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया या मानवी श्रम-सहभागाशिवाय होत नाहीत. प्राचीन काळचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी क्रमाने करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची व अंततः त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.
आता येथे कोणी प्रश्न विचारु शकतो की मुळात ही यातायात का? एक तर जनावराचे कातडे सोलून काढले कि ते आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहून नेण्याचा, स्वच्छ करण्याचा… वरकरणी घाण वाटनारा उपद्व्याप… मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र व घाणेरडा वास, चुन्याची मिठाची प्रक्रिया करताना हात-पायांवर होणारे परिणाम… हे सारे सहन करत का केले? याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवी समाजाची कातडी वस्तुंची निर्माण झालेली अपरिहार्य गरज. त्यामुळेच या व्यवसायात पूर्वी प्रचंड सुबत्ताही होती. समाजात हजार वर्षांपूर्वीपर्यंत सन्मानही होता. जवळपास आठव्या शतकापर्यंत हा व्यवसाय करणा-यांच्या श्रेण्या होत्या. भारतीय कमावलेले चर्म व त्यापासून बनलेल्या वस्तू निर्यात होत. देशांतर्गत व्यापारातही त्याचे स्थान मोठे होते. त्यामुळे यांच्या श्रेण्यांना राजदरबारीही मान असे हे आपल्याला काही शिलालेख व ताम्रपटांवरून कळते. या उद्योगाचे मानवी जीवनाला नेमके काय योगदान आहे हे प्रथम आपण पाहुयात, त्याशिवाय हे कार्य करणाऱ्या समाजांचे महत्व समजणार नाही. कातडी कमावल्यामुळे (विविध प्राण्यांची कातडी कमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.) पादत्राणे, घोड्यांचे जीन, लगाम, बैलगाड्यांसाठी बैलांच्या टिकावू व मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राणे, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली, धनुष्याच्या वादीच्या दो-या बनवता येवू लागल्या व युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी व अगदी ग्रंथ लेखनासाठीही चामड्याचा वापर होवू शकला. (अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्युंच्या धार्मिक लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत.) अवेस्ता सर्वप्रथम लिखित स्वरूपात आला तो चामड्यावरच, एके काळी तर चामड्याचे तुकडे हे चलन म्हणुनही वापरात होते.
शेतीसाठीची अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी चामड्यापासुन बनू लागल्या. त्यामुळे शेती उत्पादन वाढायला मदत झाली. फॅशनमद्धे आजही कातडी वस्तू प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग अगदी अलीकडेपर्यंत केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे, मद्याचे बुधले कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. गृहसजावटीतही विविध प्राण्यांच्या चामडी वस्तुंना प्राधान्य मिळाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. थोडक्यात चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रु बनवण्यात मोलाचा हातभार लावला. एवढेच नाही तर पर्यावरणाचे संतुलन साधायलाही हातभार लावला. पण या चर्म- वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले व ज्यांनी (चर्मकारांनी) त्यापासुन आपल्या कलेचे दर्शन घडवत मानवोपयोगी वस्तू बनवल्या, त्यांना मात्र अस्पृश्य ठरवले. मेलेल्या जनावराच्या चामड्याची पादत्राणे वापरताना, मंदिरांत वा संगीतात रममाण होतांना चर्मवाद्यांचाच प्रामुख्याने वापर करतांना, अश्वारोहन करतांना त्या चामड्याच्या वाद्या हातात धरतांना, चामड्याचे कंबरपट्टे वापरतांना, कातड्याच्याच पखालींतील पाणी पितांना वा चामड्याच्याच बुधल्यांतील तेल खाण्यात वापरतांना कोणालाही कमीपणा वाटला नाही… पण… असो.