Home » Blog » विधिमंडळात कलगीतुरे आणि कोपरखळ्या!

विधिमंडळात कलगीतुरे आणि कोपरखळ्या!

अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठरावावेळी सभागृहात हास्यकल्लोळ

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government file photo

मुंबई; प्रतिनिधी : गेली अडीच वर्षे त्यांची सत्त्वपरीक्षा होती, त्यांना मी सल्ला दिला होता अध्यक्षपद नको मंत्रिपद घ्या, त्यांच्या सासऱ्यांचाच आग्रह होता, नार्वेकरांनी असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालय बुचकळ्यात पडले, अजून केवळ तारीखच देत आहे,  जनतेने कसा करेक्ट कार्यक्रम केला? , आता कसं वाटतंय?, माझे पहिल्यापासूनच तुमच्यावर बारीक लक्ष आहे पण तुम्हीच प्रतिसाद देत नाही, संख्या कमी असेल पण आवाज कमी होऊ देणार नाही, या सारख्या एका पेक्षा एक अर्थपूर्ण शेरेबाजी व कोपरखळीने विशेष अधिवेशनातील अखेरचा दिवस गाजला. (Maharashtra Assembly)

तर विधानसभेतील सर्वांत तरुण आमदार रोहित पाटील यांच्या ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’ अशा संत वचनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

निमित्त होते ते नूतन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील अभिनंदनांचे ठरावाचे. नव्या विधानसभा निवडणुकीतील तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनात अखेरच्या दिवशीचे पहिले सत्र सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी नार्वेकर यांच्या अभिनंदनपर केलेल्या भाषणातून केलेल्या कोट्या आणि शालजोडीने गाजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांच्या मुळे हा योग आल्याचे  सांगत सुरवात करून दिली. तर शिंदे आणि पवार या उपमुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम मशीनबाबतच्या टिकेवर विरोधकांना जोरदार सुनावले. जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना हळूवार चिमटे काढले. तर नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार यांनी संख्याबळामुळे सत्तेचा माज येऊ देऊ नका, असे सुनावले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना विरोधकांचे आभार मानले.

‘अध्यक्ष महोदय तुम्ही पुन्हा येईल असे म्हणाला नव्हता. तरीही तुम्ही परत आलात याबद्दल मला आनंद आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीला न्याय देण्याचं काम तुमच्याकडून होईल, नाना भाऊ यांचे विशेष आभार मानले पाहजेत. कारण तुम्ही वाट मोकळी केली. त्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले. त्याच्या आधी त्यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली होती,’ असे ते म्हणाले. (Maharashtra Assembly)

नानांनाच क्रेडीट…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,‘गेल्या अडीच वर्षात केलेले काम आमच्यासमोर आहे. मी म्हणालो होतो की २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणेन. नाहीतर मी शेती करायला जाईल. तोही शब्द आम्ही पूर्ण केला. त्यानंतर दादा आले आणि बोनस मिळाला. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड यश दिले. विकासाचे नवे पर्व सुरु आहे. यावेळी तर विरोधी पक्षनेते पदाची संख्या चिंताजनक आहे, असे व्हायला नको होते. राहुलजी अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. मी नाना पटोलेंचे आभार मानतो. कारण त्यांनी नार्वेकरांसाठी जागा रिक्त केली अन् तिथून गाडी सुरु झाल्याने त्यांचे क्रेडिट तुम्हालाच आहे. म्हणून नाना आमचे मित्र आहेत. ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, ते  २०८ या मतांच्या  फरकाने निवडून आले आहेत. तरीही त्यांचे अभिनंदन, अशी कोपरखळीही शिंदे यांनी मारली.

आता कसं वाटतंय गार की गरम?

अजित पवार म्हणाले, ‘विरोधक उगीचच काहीतरी स्टंटबाजी करत आहेत. मारकडवाडीबद्दल आम्हालाही प्रेम, जिव्हाळा आहे पण कारण नसताना उगाच बाऊ करत बसायचे नाही. लक्षात घ्या आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे. आपल्याला जनतेने नाकारले आहे. पाच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२ महाविकास आघाडीला ४३ टक्के मते होती.आमच्या जागा कमी आल्या. पण आम्ही रडत बसलो नाही. जनतेचा कौल आहे आम्ही तो मान्य केला. त्यावेळी ईव्हीएम कसे  गार गार वाटायचे… चांगलं वाटायचे… आता कसं वाटतंय गार की गरम? हे तुमचं तुम्ही ठरवा, अशी फटकेबाजी पवारांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन करताना अनेकदा त्यांचे व सरकारचे चिमटे घेतले. ते म्हणाले, ‘मागचे अडीच वर्षे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केले. मी त्यांना नेहमी सल्ला दिला होता की, पुन्हा सरकार आले तर मंत्री व्हा, पण त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.’ त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सासऱ्यांचा तसा आग्रह होता, असे सांगितल्यावर ‘त्यांचे तुम्ही किती ऐकाल, यावर मला संशय आहे, पण ते त्यांच्या कर्तृत्वावर इथंपर्यंत आले आहेत. अजितदादांचे माझ्यावर बारीक लक्ष असते,’ असे पाटील यांनी म्हणताच ‘मी पहिल्यापासूनच लक्ष ठेवून आहे, तुमचाच प्रतिसाद नाही, असे पवार म्हणाले. त्यावर पाटील यांनी ‘आपल्या पक्षाचे स्लोगन आहे योग्य वेळ योग्य निर्णय,’ असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. (Maharashtra Assembly)

आमदार अपात्रतेबाबत नार्वेकर यांनी असा निकाल दिला की, अजून सुप्रीम कोर्टाला निर्णय देता आलेला नाही. एक न्यायमूर्ती घरी गेले, पण निर्णय काही अजून आलेला नाही. फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईल पण मागच्यावेळी ते काही येऊ शकले नव्हते. मात्र त्या पाच वर्षात त्यांनी बरेच काही साध्य केले आहे. विरोधक दुबळा अल्पमतात असलातरी त्याला सन्मान दिला, ही बाब इतरांनी शिकण्यासारखे आहे, असे पाटील म्हणाले.

नाना पटोले यांनी आपल्याला मिळालेल्या कमी मताधिक्याबद्दल खिल्ली उडविली जात आहे, हे दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे. यापूर्वी मी प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यावर विशेष काही बक्षीस मिळालेली नव्हते. शेवटी विजय हा विजय असतो. सत्तेचा माज जास्त काळ राहत नाही. याचे भान ठेवावे. जितेंद्र आव्हाड यांनीही हाच मुद्दा पुढे मांडत या सभागृहात असलेले छगन भुजबळ यांनी कमी संख्या असतानाही काय केले होते, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आमचा आवाज दाबला जाऊ नये, याचे भान सरकारने ठेवावे, असा इशारा दिला.

‘अमृताहूनि गोड नाम तुझे देवा…’,

सर्वांत तरुण आमदार रोहित पाटील यांनी पहिल्यांदाच भाषण करताना आपली चुणूक दाखवून दिली. त्यांच्या सहा मिनिटाच्या भाषणामुळे त्यांचे दिवंगत वडील आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण झाली. मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले ,‘संत तुकारामांच्या वाणीतून अभंग आला आहे, ‘अमृताहूनि गोड नाम तुझे देवा.’ संतांच्या वाणीतूनही आपले नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षालाही गोड वागणूक द्याल, अशी विनंती आपल्याला करतो. पुराणामध्येही अमृताला वेगळे महत्व होतं आणि आजही वेगळे महत्त्व आहे,’ त्यांच्या या कोटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व सदस्य हास्यरसात बुडाले.

अध्यक्ष महोदय. आपण जसा सर्वांत कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून मान पटकावला आहे, तसाच मी सर्वांत कमी वयाचा सदस्य म्हणून मान पटकावला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून सर्वांत तरुण सदस्याकडे तुमचं बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. तसेच माझ्यावर लक्ष असावे यासाठी दुसरं कारण म्हणजे तुम्ही निष्णात वकील आहात आणि मी देखील वकिलीचं शिक्षण पूर्ण करत आहे. एक नंबरच्या बाकावरील वकिलाकडे जसे तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलावर लक्ष असू द्या, असेही रोहित पाटील यांनी सांगितले. (Maharashtra Assembly)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00