रोम : भारताने फॅशन जगताला दीर्घकाळापासून प्रेरणा दिली आहे, परंतु याचे श्रेय त्याला क्वचितच मिळते, असे अनेकदा घडते. याचे ताजे उदाहरण म्हणजे कोल्हापुरी चप्पल. शतकानुशतकाचा वारसा असलेल्या आणि पूर्णपणे हस्तकलेची कमाल असलेली ही चप्पल जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशा प्रादाच्या ‘मेन्स स्प्रिंग/समर २०२६ शो’मध्ये झळकली. परंतु ते कोल्हापुरी असल्याचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. (Kohapuri in Italy)
‘प्रादा’ने मात्र यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
डिपॉझिटो ऑफ द फोंडाझिओन आयोजित ‘प्रादा’चा शोकेस हा कॉन्ट्रास्ट आणि बंडखोरीचे दृश्य रूपक होता. मियुसिया प्राडा आणि रॅफ सिमन्स यांनी डिझाइन केलेल्या या शोमध्ये ५६ बोल्ड लूक होते. यात ब्रीफ्सवर तपकिरी लेदर जॅकेट आणि चमकदार टर्टलनेकसह लेयर केलेले सूटही होते. (Kohapuri in Italy)
परंतु यापेक्षाही फॅशन जगतातील दिग्गजांचे लक्ष वेधले ते या शोमधील कोल्हापुरी चप्पलने. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘प्रादा’ने सँडल म्हणून जाहीर केलेल्या या चप्पलची किंमत तब्बल १.१६ लाख रुपये होती. पण या शोमध्ये हे मूळ कोल्हापुरी चप्पल असल्याचा उल्लेखही केला गेला नाही.
शोमध्ये मॉडेल्सनी घातलेले सँडल, अगदी अचूक होते. टॅन लेदर, स्लिम सिल्हूट, रिंग्ड टोज. ‘प्रादा’ने या डिटेलिंगमध्ये आणखी भर घातली ती ‘‘लेदर रिंग’’ची. विशेषत: कोल्हापुरी चप्पल परिधान केलेल्या मॉडेलने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Kohapuri in Italy)
असे असले तरी मूळ कोल्हापुरी असलेल्या या कारागिरीला श्रेय मात्र मिळाले नाही. ही चप्पल मूळची कोल्हापुरी असल्याचा नामोल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे अर्थातच नेटकऱ्यांनी तसेच भारतीय फॅशन जगतातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
समाजमाध्यमावर तीव्र प्रतिक्रीया
एका एक्स यूजरने ‘प्रादा’वर तीव्र आक्षेप घेतला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘‘प्रादा SS26 मध्ये कोल्हापुरी चप्पल दाखवण्यात आले. ते मूळ कोल्हापूरचे आहे. ही चप्पल हाताने बनवली जाते. त्यावरील कलाकुसर अत्यंत गुंतागुंतीची असते. ‘स्कॅन्डिनेव्हियन स्कार्फ’ प्रमाणेच, पाश्चात्य फॅशन जगत भारतीय फॅशनला गिळंकृत करू पाहतेय.’’
संस्कृतीचा आदर केला नाही तर अशीच अवस्था होणार
दुसऱ्या एका यूजरने आपणच आत्मपरिक्षण करायला हवे असे मत नोंदवले आहे. ‘‘जर तुम्ही तुमच्या संस्कृतीला महत्त्व दिले नाही, तर दुसरे कुणीतरी तिची नक्कल करेल आणि ती पळवून नेईल आणि आमचीच आहे म्हणून मिरवेल. ‘प्रादा’मध्येही तेच घडत आहे. ‘प्रादा’ आता शेकडो डॉलर्सना कोल्हापुरी चप्पल विकत आहे, तर पिढ्यानपिढ्या ही कला जिवंत ठेवणाऱ्या आमच्या कारागिरांना कोणतेही श्रेय किंवा योग्य मोबदला मिळत नाही,’’ अशी टिप्पणीही या यूजरने केली आहे. (Kohapuri in Italy)
‘’प्रादाच्या नव्या हंगामातील ऑफर – ‘कोल्हापुरी चप्पल!’ कोल्हापुरी चप्पलचे जिओ-टॅगिंग नाही का? ते आमचा वारसा चोरून तो प्रचंड किमतीत विकू शकतात का?’’ असा प्रश्न तिसऱ्या वापरकर्त्याने उपस्थित केला आहे.
जीआय टॅगिंग २०१९मध्ये
कोल्हापुरी चप्पलला भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने २०१९ साली भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग दिला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना तर कर्नाटकमधील धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपूर या जिल्हांना जीआय मानांकन मिळाले आहे. तरीही मूळ कोल्हापुरी चप्पलच्या बांधणीत काहीअंशी फरक करून ‘प्रादा’सारख्या स्वत:च्या नावावर ते खपवल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापुरीचे प्रकार
कोल्हापुरी पायताण, शाहू चप्पल, कुरूंदवाडी, कापशी, लिंगनुरी, धनगरी आदी.