तेल अवीव/ तेहरान : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष गुरुवारी (१९ जून) सातव्या दिवशी तीव्र झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. (Israel threats Khamenei)
इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास चेर्नोबिलसारखी आपत्ती येऊ शकते, अशी भीती रशियाने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ‘‘यापुढे जीवंत राहण्याचा अधिकार नाही,’’ तर नेतान्याहू यांनी इराणच्या अणुऊर्जा आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा धोका संपवण्याची शपथ घेतली आहे.
रशियाच्या अणुऊर्जा महामंडळाच्या प्रमुखांनी इशारा देताना गुरुवारी (१९ जून) म्हटले आहे की, इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने हल्ला केल्यास चेर्नोबिलसारखी आपत्ती निर्माण होऊ शकते. सद्यस्थितीत बुशेहर हा कार्यरत असलेला इराणचा एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे. तो रशियाने उभारला आहे. (Israel threats Khamenei)
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या संघर्षात अमेरिका संभाव्य लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलवर नवीन क्षेपणास्त्रांचा मारा केला. यात एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आले.
गुरुवारी पहाटे दक्षिण इस्रायलमधील मुख्य रुग्णालयावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. इमारतीचेही मोठे नुकसान झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.
वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एक क्षेपणास्त्र एका उंच इमारतीवर आदळले. तेल अवीवजवळील किमान दोन ठिकाणी अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अॅडोम बचाव सेवेनुसार, हल्ल्यांमध्ये किमान ४० लोक जखमी झाले आहेत. (Israel threats Khamenei)
इस्रायलकडून इराणच्या अणुभट्टीवर हल्ला
गुरुवारी इस्रायलच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या अराक अणुभट्टीवर हल्ला करण्यात आला.
हल्ल्यापूर्वीच ही जागा रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे.
इस्रायलने या केंद्रावर संभाव्य हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर आणि लोकांना हा परिसर रिकामा करण्याची सूचना देण्यात आली होती. इराणने इस्रायली लष्करी स्थळे, वरिष्ठ अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करून अचानक हवाई हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा हल्ला केला.
हेही वाचा :
इराण कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही : खामेनी