Home » Blog » IPL Final : आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स

IPL Final : आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स

by प्रतिनिधी
0 comments
IPL

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची आयपीएल चषक उंचावण्याची तब्बल सतरा वर्षांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी अठराव्या पर्वाच्या अंतिम सामन्यात संपुष्टात आली. मर्यादित आव्हानानंतरही अचूक गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूने पंजाब किंग्जला ६ धावांनी नमवून इंडियन प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. बेंगळुरूच्या ९ बाद १९० धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबला ७ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. (IPL Final)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या. बेंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या बेंगळुरूने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली. लियाम लिव्हिंगस्टन (२५ धावा), जितेश शर्मा (२४ धावा) आणि रोमारिओ शेफर्ड (१७ धावा) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे बेंगळुरूला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.(IPL Final)

बेंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने पाच षटकांत ४३ धावांची सलामी दिली. प्रियांश २४, तर प्रभसिमरन २६ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरला केवळ १ धाव करता आली. पंजाबकडून जोश इंग्लिसने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली होती. मात्र, कृणाल पंड्याने १३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लिसचा अडसर दूर केला. इंग्लिसने २२ चेंडूंमध्ये १ चौकार व ४ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर, शशांक सिंगने अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, त्याला दुसऱ्या बाजूने साथ लाभली नाही. शशांकने ३० चेंडूंमध्ये ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी केली. बेंगळुरूकडून भुवनेश्वर कुमार आणि कृणालने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – २० षटकांत ९ बाद १९० (विराट कोहली ४३, रजत पाटिदार २६, लियाम लिव्हिंगस्टोन २५, अर्शदीप सिंग ३-४०, काइल जेमिसन ३-४८) विजयी विरुद्ध पंजाब किंग्ज – २० षटकांत ७ बाद १८४ (शशांक सिंग नाबाद ६१, जोश इंग्लिस ३९, प्रभसिमरन २६, भुवनेश्वर २-३८, कृणाल २-१७).

हेही वाचा :

सिंधू, सात्विक-चिराग यांची विजयी सलामी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00