कोल्हापूर; प्रतिनिधी : दिल्ली येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रगतशील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि जगभरातील नामवंत आयटी कंपन्यांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी पार्क हब निर्मितीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी मंत्री वैष्णव यांच्याकडे केली. (Dhananjay Mahadik)
कोल्हापूरला उद्यमशीलतेचा मोठा वारसा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रगत शहर, दळणवळणाच्या दृष्टीने सोईस्कर शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. कृषी- औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असून, दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर देशात अव्वल स्थानी आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारले असून आधुनिक औद्योगिक वसाहती वेगाने प्रगती करत आहेत. मात्र अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क तयार झालेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या गुणवंत अभियंता आणि तरुणांना, पुणे- मुंबई- बेंगलोर- हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तरुण-तरुणी आयटी क्षेत्रात संपूर्ण देशभर काम करत आहेत. कोल्हापुरातच सुसज्ज अत्याधुनिक आयटी पार्क हबची निर्मिती झाली, तर स्थानिक औद्योगीकरणाला आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन , कोल्हापुरात आयटी पार्क हब उभारण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी नामदार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. (Dhananjay Mahadik)
हेही वाचा :