नवी मुंबई : जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधनाच्या झंझावाती अर्धशतकांमुळे भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा टी-२० सामना ४९ धावांनी जिंकला. या विजयी सलामीसह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Women’s Cricket)
नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. मानधना आणि उमा छेत्री या सलामी जोडीने ६.३ षटकांत भारताच्या पन्नास धावा धावफलकावर लावल्या. छेत्री २४ धावा काढून बाद झाल्यानंतर मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. मानधनाने ३३ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा केल्या. जेमिमाने अखेरच्या षटकापर्यंत फटकेबाजी करत ३५ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. (Women’s Cricket)
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १४६ धावाच करता आल्या. विंडीजकडून डिएंड्रा डॉटिनने ४ चौकार व ३ षटकारांसह ५२, तर शेमेन कॅम्पबेलने ५ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर मात्र विंडीज संघाला अपेक्षित धावगती राखता आली नाही. भारतीय संघातील तितास साधूने ३, तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
हेही वाचा :