झारखंड; वृत्तसंस्था : झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चासह इंडिया आघाडीने ५६ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे, तर भाजपने २४ जागांवर आघाडी घेतली. झारखंड मुक्ती मोर्चाला ३४ च्या दरम्यान, तर काँगेसला १६ जागा मिळाल्या.
बहुमत मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, की मला सर्व समाजातील लोक, शेतकरी, महिला आणि तरुणांचे आभार मानायचे आहेत. मी इथे उपस्थित असलेल्या नेत्यांचेही आभार मानतो. आम्ही पूर्ण निकालाची वाट पाहत आहोत. यानंतर आम्ही पुढील पाऊल उचलू आणि निर्णय घेऊ. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन म्हणाल्या की, गांडेयमधील लोकांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहो, हीच प्रार्थना
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, माझी ताकद माझी पत्नी कल्पना सोरेन यांनी विजय मिळवला.
नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
झारखंड निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधानांनीही प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड निवडणुकीत जेएमएमच्या विजयाबद्दल हेमंत सोरेन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले की, “झारखंडच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकांचे प्रश्न मांडण्यात आणि राज्यासाठी काम करण्यात आम्ही नेहमीच सगळ्यांच्या पुढे राहू, राज्यातील कामगिरीबद्दल मी जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीचे अभिनंदन करतो.”
दोन टप्प्यांत झाले होते मतदान
झारखंड विधानसभेच्या ८१ मतदारसंघांसाठी १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ही ६८ टक्के इतकी होती. ती आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने ३०, काँग्रेस १६ आणि आरजेडीने एक जागा जिंकली, तर भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या.