कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी महाराष्ट्र दिनमानशी बोलताना व्यक्त केला.
खासदार शाहू छत्रपतींनी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळण्याच्या भूमिकेतून मधुरिमाराजे यांची उमेदवारी मागे घेतली, मालोजीराजे यांनीही सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून लाटकर म्हणाले, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मला जाहीर झाली हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटला होता, परंतु आवश्यक ती प्रक्रिया न राबवता उमेदवारी रद्द झाल्याचे दुःखही मला व माझ्या कुटुंबीयांना कार्यकर्त्यांना झाले. त्यामुळे कार्यकर्त्याचा सन्मान जपण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणार कायम राहिलो होतो. मधुरिमाराजे यांनी मोठे मन दाखवून उमेदवारी मागे घेतली, त्यांचा मी शतशः ऋणी आहे.
महापालिकेत एखाद्या प्रभागाचे नेतृत्व करणे आणि शहराचे नेतृत्व करणे यात फरक असल्याचे मान्य करून लाटकर म्हणाले, मी महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती म्हणून शहराच्या पातळीवर काम केले आहे. पत्नी महापौर होती त्या काळातही शहर नजरेसमोर ठेवूनच आम्ही सकारात्मक विचाराने काम केले. त्यामुळे कोल्हापूर शहर, इथले प्रश्न, इथल्या नागरिकांच्या समस्या यांची जाणीव आहे. आजवर काँग्रेसच्या विचारानेच चालत आलो. सतेज पाटील यांच्यासारखा हिमालयाएवढा आधारवड आमच्या पाठीमागे आहे. शाहू महाराजांसारखे नेतृत्व आहे. यांच्याबरोबरच मालोजीराजे, जयश्रीताई जाधव, दिवंगत चंद्रकांतअण्णा जाधव अशा सगळ्यांनी मिळून गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे. दोन्ही विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही आम्ही कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल, याची मला खात्री आहे.
महायुती सरकारच्या काळात अनेक गोष्टी बिघडल्या. भ्रष्टाचार बोकाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महागाई वाढली. बेरोजगारी वाढली. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी धार्मिक, जातीय विद्वेषाचे मुद्दे पुढे आणले जात असल्याचा आरोप करून लाटकर म्हणाले, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. समतेची भूमी आहे. या भूमीत विषारी विचार रुजणार नाही. इथला सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. इथला सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
यावेळी झालेली प्रश्नोत्तरे अशीः
प्रश्न : तुमच्या उमेदवारीची चर्चा जेव्हा पासून सुरू होती. तुम्ही ही इच्छुक होता. त्यावेळी तुम्हाला किती टक्के शक्यता वाटत होती?
उत्तरः निवडणूक प्रक्रियेमध्ये इच्छा असणे क्रमप्राप्त आहे. पण आम्ही जे सर्वजण इच्छुक होतो. महापालिकेतील बहुतांश सहकारी आणि काही सिनियर मंडळी तयार होते. यावेळी आमच्या नेत्यांनी आपण कार्यकर्ता पॅटर्न करायचा आहे, असे सांगितले त्यामुळे वाटत होते. पण मनाला खात्री नव्हती की, पण जो काही निर्णय होईल तो आपण सगळ्यांनी एकत्र घेऊन पुढे जायचे हा निर्णय आम्ही केला होता. आणि यावर मी ठाम होतो. आजपर्यंत पक्ष, पुरोगामी विचार, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, लोकसभा अशा ठिकाणी आदेशाचे पालन करून काम केले. पक्षाकडे अर्ज भरणे, मुलाखत देणे, प्रक्रियेतून गेल्यामुळे जरा आपला नंबर लागतो का अशी आशा होती.
प्रश्नः नगरसेवक म्हणून काम केले, स्थायी समिती सभापती म्हणून काम केले, पण आपण आमदारकी लढवावी असं का वाटू लागलं?
उत्तरः कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ नागरी वस्तीचा आहे. शहरातील ८१ प्रभागापैकी ५६ प्रभाग यामध्ये येतात. यामुळे या मतदार संघातील सगळे प्रश्न हे महापालिकेच्या अंतर्गत येणारे प्रश्न आहेत. यामुळे नगरसेवक म्हणून काम करत असताना नागरिकांच्या समस्या आणि अडचणी याची आम्हाला जाणीव असते. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी जे बजेट पाहिजे आणि जे ज्यादा आणि चांगल्या पद्धतीने काम करायला जो अधिकार पाहिजे त्याच्या मर्यादा या मला जाणवत होत्या. त्यातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. आमदार झाल्यास शहराच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे काम करता येईल, असे वाटत होते.
प्रश्नः मधुरिमाराजेंची माघार झाल्यानंतर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची भावना होती?
उत्तरः छत्रपती घराण्याने माघार घ्यावी अशी आमची इच्छा नव्हती. ठाम भूमिका नव्हती. सुरुवतीला काँग्रेसच्या चर्चेतून माझे नाव जाहीर झाले. त्यामुळे लोकभावना झाल्याने ते मनात राहिले. माघारीचे दुःख काय असते ते मला त्यावेळी जाणवले. तिकीट जाहीर झाले नसते तर त्या भावना वेगळ्या होत्या. लोकांची भावना झाली की, आपण माघार घेऊन नये. त्यामुळे माघार घेतली नाही. चर्चेतून माघार झाली असती तर बरे झाले असते. मी त्यामुळे त्या परिवाराचा शतशः आभारी आहे.
आताचा प्रलोभनाचा काळ आहे आणि माझ्या बाबतीतही तसा प्रयोग झाला. परंतु मी त्याला बधलो नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. मी बंटी साहेब व छत्रपती शाहू महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने लढायचे ठरवले होते. त्यानंतर मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर त्यांनी मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. मला त्यांच्याबरोबर जायचे आहे. त्यानंतर मी पाठिंब्यासाठी त्यांना पत्र दिले. त्यांचा पाठिंबा मिळाला, हा माझ्यासाठी सुध्दा सुखद धक्का होता.
शहराचे चित्र बदलायचे आहे.
कोल्हापूरच्या दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. रस्ते, ट्रॅफिक जाम आहे. कचऱ्याचा प्रश्न आहे, वितरण व्यवस्था खराब आहे. हवा प्रदूषित झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे. रोजगार नाही, क्रींडागणे चांगली नाहीत. आता कोल्हापूर मध्ये विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. कोल्हापुरच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत.इथे एक किलोमीटरचा चांगला रस्ता नाही. तसा दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. अदृश्य हुकुमशाही केली जात आहे. छत्रपतींचे नाव घेतले जाते आणि काँन्ट्रक्टर व भांडवलदारांचे भले केले जात आहे. सार्वजनिक व्यवस्था कोलमडली आहे. महायुती सरकारने फार मोठी दुर्दशा केली आहे. घाणेरडी अवस्था केली आहे. ती बदलायची आहे.