डॉ. माणिकराव साळुंखे यांना इंडियन केमिकल सोसायटी या अग्रगण्य संस्थेचा २०२४ सालचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यापुरस्कारासह संस्थेची आजीव फेलोशिपही त्यांना प्रदान करण्यात येणार असून जयपूर येथे डिसेंबरमध्ये संबंधित कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारामुळे एका व्रतस्थ शिक्षक, प्रशासक आणि संशोधकाचा गौरव झाला आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरील साडे चार वर्षाच्या कारकीर्दीत डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामज्यंस करार, विविध संशोधनात्मक प्रकल्पांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत विद्यापीठाला गतिमान केले. माणिकरावांनी कुलगुरूपदाची सूत्रे घेण्याच्या आधीची साधारण आठ-नऊ वर्षे शिवाजी विद्यापीठ राजकारणाने पोखरले होते. त्यांनी सूत्रे घेतल्यानंतर कठोरपणे निर्णय घेऊन विद्यापीठातले राजकारण हद्दपार केले. राजकारण करणाऱ्या प्राध्यापकांना शैक्षणिक कामात गुंतवले. ‘कमवा आणि शिका’ योजनेची व्याप्ती वाढवून कुणाही विद्यार्थ्याला उच्चशिक्षण घेण्यात आर्थिक अडचण येणार नाही, याची तजवीज केली. शिवाजी विद्यापीठानंतर जयपूरच्या केंद्रीय विद्यापीठातही त्यांनी कार्याचा ठसा उमटवला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कारभारालाही गती देण्याचे प्रयत्न त्यांनी केले, परंतु तिथे राजकारण वरचढ ठरल्यामुळे त्यांनी बाहेर पडणे पसंत केले..
शिवाजी विद्यापाठाच्या कुलगुरूपदी असताना त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी विद्यापीठात आणला. परदेशी विद्यापीठांशी सामज्यंस करार करत संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. विद्यापीठाचा संशोधनाचा टक्का वाढावा म्हणून प्रत्येक प्राध्यापकांने युजीसीकडे संशोधन प्रकल्प सादर करणे बंधनकारक केले होते. विद्यापीठात तंत्रज्ञान विभागाची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झाली.
डॉ.साळुंखे यांनी ११ जून २००४ ते २८ फेब्रुवारी २००९ कालावधीत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. प्रशासनावर प्रचंड हुकूमत आणि गतिमान प्रशासन हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्ये. विद्यापीठातील कोणत्याही प्रकल्पाचे सादरीकरण असो की प्रकल्पाची अंमलबजावणी प्रत्येक गोष्टीवर त्यांचे बारकाईन लक्ष असे. ज्या त्या विषयाचा अभ्यास असल्यामुळे अधिकारी वर्गालाही संबंधित विषयाचा अभ्यास करूनच त्यांच्या समोर एखाद्या विषयाची मांडणी करावी लागायची.
माणिकराव साळुंखे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. रसायनशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण, पीएचडी प्राप्त करतानाच त्यांनी विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी केली होती. त्यांनी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षपदही भूषविले होते. यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी विकासाचा रोड मॅप नजरेसमोर ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.
त्यांच्या कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाने श्रीलंका, कोरिया, थायलंड अशा विविध देशातील नामांकित विद्यापीठांशी करार केले. सामज्यंस करारामुळे दोन्ही विद्यापीठात संशोधक विद्यार्थी, प्रोफेसर यांच्यामध्ये ‘नॉलेज शेअरिंग’सुरू झाले. विविध विद्यापीठांशी सामजस्य करारासोबतच त्यांच्या कालावधीत ‘लीड कॉलेज’ संकल्पना मूर्त रूपात आली. एका कॉलेजच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस कॉलेजिसनी एकत्र यायचे. लीड कॉलेज या नावांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून २५ रूपये शुल्क आकारणी केली जायची. या माध्यमातून जमा होणारा निधी ‘लीड कॉलेज’अंतर्गत शैक्षणिक उपक्रम, सेमिनार, विद्यार्थी हिताचे उपक्रमासाठी खर्च केला जायचा. विशेष म्हणजे, जी महाविद्यालये आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना निधी उपलब्ध करून दिला जातो. दरवर्षी ‘लीड कॉलेज’चे नेतृत्व कॉलेजकडे सोपविले जाते. शिवाजी विद्यापीठात सुरू झालेली ‘लीड कॉलेज’ संकल्पना नंतर देशभरातील बहुतेक विद्यापीठांनी स्वीकारली. विद्यापीठात दीक्षांत समारंभासाठी भव्य सभागृह उभारले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच परिसर विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. समाजातील विविध घटकांना विद्यापीठाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. दीक्षांत समारंभाच्या काळात ग्रंथमहोत्सव सुरू केला. `विद्येच्या प्रांगणात` हे त्यांचे अनुभवकथन प्रसिद्ध झाले असून त्यातून त्यांचा सगळा प्रवास उलगडतो.