नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा रोखला. मात्र शेतकरी दिल्लीकडे जाण्यावर ठाम राहत आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दिशेने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे शेतकरी संघटनांनी मोर्चा पुन्हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Delhi Morcha)
शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी सांगितले की, अश्रुधुराच्या माऱ्यात आठ शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांपैकी एकाला चंदीगडमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापुढे काय पाऊल उचलायचा याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात येईल.
याआधी शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी, १०१ शेतकऱ्यांचा जथ्था शंभू सीमेवरील त्यांच्या निषेधाच्या ठिकाणाहून दिल्लीच्या दिशेने कूच करू लागला. परंतु हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या बहुस्तरीय बॅरिकेडिंगमुळे काही मीटर अंतरावर त्यांना रोखण्यात आले. शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले. त्यामुळे त्या दिवसापुरता मोर्चा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर केंद्राने चर्चा न केल्यास ८ डिसेंबरला पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाण्याचा ठाम निर्धार केला होता. (Delhi Morcha)
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी मिळावी यासाठी केंद्रावर दबाव आणण्याचा निर्धार करून रविवारी पहिला जथ्था दिल्लीकडे जात होता. एमएसपी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, वीज दरवाढ करू नये, शेतकऱ्यांविरूद्ध केलेल्या पोलीस केस मागे घ्याव्यात आणि २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय द्या अशी अन्य मागण्या शेतकऱ्यांनी लावून धरल्या आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी शंभू सीमेवर बॅरिकेड्स आणि खिळे लावले आहेत.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली जमलेले शेतकरी केंद्राने त्यांना एमएसपीसाठी कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत. याच मागण्यांसाठी त्यांनी १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकला होता. त्यावेळी त्यांचा मोर्चा दिल्लीकडे जात असताना सुरक्षा दलांनी रोखला होता.
शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी शुक्रवारी शंभू सीमेवर बोलताना सरकारशी चर्चेसाठी उद्यापर्यंत वाट पाहणार असल्याचे सांगितले होते. तसेच आम्ही सरकारच्या निमंत्रणाची वाट पाहू अन्यथा १०१ शेतकऱ्यांचा जथ्था ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिल्लीकडे कूच करेल, असा इशारा दिला होता.
#WATCH | Farmers protesting over various demands have been stopped at the Shambhu border from heading towards Delhi
Heavy police presence at the Shambhu border pic.twitter.com/G4CNr6locb
— ANI (@ANI) December 6, 2024
हेही वाचा :
- माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष
- शेतकऱ्यांचे पुन्हा ‘दिल्ली चलो’
- दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले