Home » Blog » कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

by प्रतिनिधी
0 comments
(Expansion of Kolhapur's city limits is essential)

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई धार्मिक पर्यटन स्थळ, मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर  यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे.  कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Expansion of Kolhapur’s city limits is essential)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, मेजर ध्यानचंद स्टेडियम एस्ट्रोटर्फ, रंकाळ्यातील संगीत कारंजे, अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प , ४८४ कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पण झाले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.

 संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह महाराष्ट्राचा मानबिंदू

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले. पूर्वी ‘पॅलेस थिएटर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला १९५७ पासून ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या आणि कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. (Expansion of Kolhapur’s city limits is essential)

मुख्यमंत्र्यांनी केला कोल्हापूरातील कलाकारांचा गौरव

कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. नाट्य चळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबुजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे. (Expansion of Kolhapur’s city limits is essential)

सीपीआरमध्ये मॉड्युलर बर्न वॉर्ड सह आरोग्य सुविधा

 छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वारसा स्वरुप जतन करून चांगल्या प्रकारे पुनुरूज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री  म्हणाले, येथे ८ मॉड्युलर थिएटर्स असलेल्या ऑपरेशन थिएटर्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड तयार झालेला आहे. ३० मॉड्युलर बेडचा अपघात विभाग, डायलिसिसची सुविधा आदी अनेक गोष्टींमुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये गुणात्मक बदल होत आहे. आता शेंडा पार्कमध्ये देखील ६०० बेड सर्वोपचार रुग्णालय करण्यात येणार असून २५० बेड कर्करोग रुग्णालय आणि २५० बेडच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश आहे. 

जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अजित पवार पुढाकार घेत

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, करवीर नगरीतील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे नव्याने जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत आहे. हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि समाधानाचा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण  विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढाकार घेतला. नाट्यगृहासोबतच राजर्षी शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम होत असून ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे.  

कोल्हापूर विमानतळाचा रन वे  वाढवण्यासाठी परवानगी द्यावी

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरची नवी ओळख बनत आहे. आयटी सेंटरसाठी ८० एकर जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नवीन पिढीसाठी प्रचंड मोठे काम उभे राहत आहे. राजाराम महाराजांनी विमानतळाची सुरुवात इथे केली. पण आज पुणे फार पुढे गेले आहे. बेळगावला सुद्धा कोल्हापूरपेक्षा चांगल्या पद्धतीचे फ्लाईट्स आहेत. कोल्हापूर येथे आता मोठे एअरबस यायला हवेत. १७०० मीटरचा रनवे २३०० मीटरचा करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी.

अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब  बनवणार

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणलेल्या आहेत. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब  बनविण्यात येत आहे. एक-दोन वर्षांनी कोल्हापूर शहर, कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याला जावे लागणार नाही, अशी व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी जवळपास ४७३ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकारत आहे.

कोल्हापूर हेरिटेज सिटी जाहीर करावी

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर इमारतीप्रमाणे ७४ हेरिटेज इमारती कोल्हापूरमध्ये आहेत. तसेच अनेक मोठे तलाव यामध्ये  रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव,  कोटितीर्थ, हनुमान तलाव असे अनेक तलाव छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी दिलेले आहेत. शासनाच्या वतीने या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन करत, पर्यटन वाढीसाठी कोल्हापूरला ‘हेरिटेज सिटी’ घोषित करावी. ‘हेरिटेज संवर्धन प्लॅन’ (Heritage Conservation Plan) अंतर्गत भरीव निधीची तरतूद करून देशामध्ये कोल्हापूरचा एक नाव लौकिक वाढवावा, अशी विनंती केली.  प्रास्ताविक महापौर रुपाराणी निकम यांनी केले आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मानले.  (Expansion of Kolhapur’s city limits is essential)

You may also like

error: Content is protected !!