कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Free electricity for farmers during the day)
कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाची पुनर्बांधणी कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.
मुख्यमंत्र्यांकडून राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, मोफत शिक्षण सुरू केले, वंचितांसाठी विविध आनुषंगिक योजना राबवल्या आणि अस्पृश्यतेला गुन्हा मानून त्यावर बंदी घातली, असे त्यांनी नमूद केले. (Free electricity for farmers during the day)
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अविष्कार असून, त्यांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांमुळे आजही जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इथेनॉलमुळे साखर कारखानदारी टिकून
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे.
देशातील पहिला सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूरात
साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शाहू महाराजांनी शेतकऱ्यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी : सुनेत्रा पवार
राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली. समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. प्रास्ताविक कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले. (Free electricity for farmers during the day)