11
मुंबई; विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृह खातेही पक्षाला मिळावे, यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे अद्यापही आग्रही आहेत. तिन्ही पक्षांच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी आज (दि.१) सांगितले.
महायुती -२ सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महायुतीमधील घटक पक्षातील खातेवाटप व मंत्रीपदाच्या फॉर्मुल्याबाबत अध्याप निर्णय झालेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावाहून ठाण्याला परतले असून रात्री उशिरापर्यंत ते कुठल्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत होते. सोमवारी (दि.२) भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षाच्या नेत्यांची बरोबर त्यांची चर्चा होऊन मंत्रिमंडळ स्थापनेबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
गुरुवारच्या मॅरेथॉन बैठकीनंतर मुंबईत महायुतीची बैठक घेण्याऐवजी आता थेट साताऱ्यातील गावी जाऊन दोन दिवस विश्रांती घेतली. तब्येत ठीक नसल्याने त्या ठिकाणी उपचार करण्यात आले. दरम्यानच्या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या सरकारची स्थापना पाच डिसेंबरला होणार असल्याचे जाहीर केले व त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाचे देशभरातील नेते व अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान नाराज शिंदे यांनी महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी हे अखेरचे दबाव अस्त्र वापरले असून गृहखाते सेनेला मिळावे ,यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर भाजपा श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात यावर महायुती -२ सरकारची स्थापना होईल.
मुख्यमंत्रीपदाची निवड निश्चित करण्यासाठी गुरुवारी दिल्लीत देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख नेते ठाण मांडून होते. पहिल्यांदा फडणवीस व अजित पवार यांचे दिल्लीतील तटकरे यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा दिल्लीत पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत या तिघांसह अन्य प्रमुख नेत्यांची बैठक दीर्घकाळ झाली.
त्यानंतर शिंदे व शाह यांची स्वतंत्रपणे बैठका झाल्यानंतर मध्यरात्री सर्व नेते मुंबईसाठी रवाना झाले होते. यानंतर मंत्रीपदाचे वाटप व खात्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिंदे यांनी गृह, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खाते एकूण बारा मंत्रिपदे देण्यात यावी, असा आग्रह धरला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एका उपमुख्यमंत्रीपदासह मागच्या सरकारमध्ये असलेली खाती आपल्याकडे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. भाजपा श्रेष्ठीं गृह खाते वगळता शिंदेंच्या मागणीप्रमाणे अन्य हाती देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शिंदे गृह खात्यासाठी आग्रही राहिल्याने मंत्रीपदाच्या फॉर्म्युला मुंबईतील बैठकीत पक्षाचे निरीक्षक आल्यानंतरच करण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून लवकरच खातेवाटप व मंत्रिमंडळाच्या फॉर्मुल्याबाबत निर्णय घेतला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाण्याकडे रवाना होण्यापूर्वी साताऱ्यात पत्रकाराशी बोलताना त्यांनी गृह खाते, तसेच खा.श्रीकांत शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल, असे सांगितले.