मुंबई : पहलगामच्या घटनेला अद्याप दोन-तीन महिनेही झाले नाहीत, तोवरच पाकबरोबर आता भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे, मग आता सिंदूर कुठे गेला? गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का?, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. (Uddhav criticizes Modi)
वृक्षरोपण व संवर्धन ‘प्रेरणा मास’ बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर ह्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व वर्षपूर्ती निमित्त कार्य पुस्तिकेचे प्रकाशन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कबुतरे, कुत्री आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात. मात्र, हीच माणुसकी जेव्हा पहलगाममध्ये लोक मारले गेले तेव्हा कुठे गेली होती, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav criticizes Modi)
‘‘पहलगामच्या घटनेला अद्याप दोन-तीन महिनेही झाले नाहीत, संरक्षणमंत्री म्हणाले होते की अजून सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही. आपले पंतप्रधान म्हणाले की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. मेरी रगों रगों में खून नहीं गर्म सिंदूर बह रहा है, मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक्स झालं का? तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देता? आपल्या देशाची टीम पाकिस्तानबरोबर आता क्रिकेट खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? तुम्ही घराघरात सिंदूर वाटला ना, मग तो सिंदूर कुठे गेला? कशाला या भाकडकथा करता?”, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav criticizes Modi)
ते म्हणाले, “प्रत्येक प्रश्नावेळी डोक्यावर बर्फ आहे, काय करू? थंडपणा आपल्याला परवडणारा नाही. माझी उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे. आपण सध्या शिक्षणाच्या दर्जावर लक्ष देण्याऐवजी आज हिंदीच्या सक्तीवर लक्ष का देत आहोत? शिक्षणाचा दर्जा आपण का उंचावत नाहीत? आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र, सक्ती कशासाठी पाहिजे? काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत गेलो होतो, तेथेही हा प्रश्न मला अपेक्षित होता. तिथेही मी सांगितलं की आम्ही हिंदीला विरोध करत नाहीत, तर फक्त सक्तीला विरोध करत आहोत. आता माझ्या पेक्षा आपले पंतप्रधान चांगलं हिंदी बोलतात. मग ते कोणत्या शाळेत शिकले? त्यांनाही पहिलीपासून हिंदी सक्ती होती का? मग तरीही त्यांना आश्वासनं देण्यापुरती का होईना हिंदी येती ना”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.