Home » Blog » शिक्षणतज्ज्ञ प्रधानमंत्री

शिक्षणतज्ज्ञ प्रधानमंत्री

शिक्षणतज्ज्ञ प्रधानमंत्री

by प्रतिनिधी
0 comments
Harini Amarasuriya file photo

मागील आठवड्यापर्यंत हरिणी अमरसूर्या हे नाव श्रीलंकेबाहेर फारसे कोणाला परिचित नव्हते. मात्र, श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमार दिस्सानायके यांनी २१ जणांच्या मंत्रिमंडळाची घोषणा करतानाच पंतप्रधान म्हणून हरिणी यांचे नाव जाहीर केले आणि जगाचे लक्ष हरिणी यांच्याकडे वेधले गेले.

हरिणींची राजकीय कारकीर्द उण्यापुऱ्या चार-पाच वर्षांची. त्याअगोदरची त्यांची कारकीर्द शिक्षणक्षेत्रातील आहे. ६ मार्च १९७० साली जन्मलेल्या हरिणींचे बालपण कोलंबोमध्ये गेले. कोलंबोतील बिशप कॉलेजमध्ये शिकताना त्या विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत एक वर्ष अमेरिकेलाही राहिल्या होत्या. त्यानंतर, त्यांनी भारत सरकारची समाजशास्त्र विषयासाठीची शिष्यवृत्ती मिळवली आणि १९९१ ते १९९४ या काळात दिल्ली विद्यापीठांतर्गत हिंदू कॉलेजमधून ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’चा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. श्रीलंकेत परतल्यानंतर त्यांनी काही काळ त्सुनामीबाधिक लहान मुलांसाठी आरोग्यसेविका म्हणून काम केले. त्यानंतर, मॅक्वेरी विद्यापीठातून त्या डेव्हलपमेंटल अँथ्रेपोलॉजी (विकासविषयक मानववंशशास्त्र) या विषयातून एम. ए. झाल्या, तर एडिनबरो विद्यापीठातून सोशल अँथ्रेपोलॉजी (सामाजिक मानववंशशास्त्र) विषयातील पीएच. डी. ही त्यांनी पूर्ण केली.

श्रीलंकेतील ओपन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी दशकभराचा काळ अध्यापन केले. विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या त्या विभागप्रमुख बनल्या. तिथेच त्या फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (फुटा) या संघटनेच्या सदस्य बनल्या आणि प्राध्यापकवर्ग व अन्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेतर्फे होणाऱ्या कामकाजामध्ये त्यांचा सहभाग वाढला. त्यांच्या राजकीय प्रवेशाची ही नांदी होती. हरिणी या २०१९ मध्ये नॅशनल इंटेलेक्चुअल्स ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी झाल्या आणि अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी नॅशनल पीपल्स पॉवरचे (एनपीपी) उमेदवार अनुरा कुमार दिस्सानायके यांचा प्रचार केला. याच पक्षाने २०२० मध्ये हरिणी यांची नामांकित संसदसदस्य म्हणून नियुक्ती केली. यानंतर, त्या ओपन युनिव्हर्सिटीमधील पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकारणात उतरल्या. संसदसदस्य म्हणून त्यांनी श्रीलंकेतील वांशिक, धार्मिक आणि राजकीय दरी कमी करण्यासाठी काम केले.

श्रीलंकेसाठी मागील दोन वर्षे प्रचंड आंदोलने आणि राजकीय उलथापालथींची ठरली. यादरम्यान, लोकांचा कल प्रस्थापित राजकीय पक्षांवरून नव्या पक्षाकडे झुकू लागला. याचाच परिपाक म्हणून संसदेत अवघे तीन सदस्य असणाऱ्या एनपीपी पक्षाचे दिस्सानायके या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तब्बल ५६ टक्के मतांसह विजयी होऊन देशाचे अध्यक्ष बनले. २४ सप्टेंबर रोजी त्यांनी हरिणी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. सिरिमावो बंदारनायके आणि चंद्रिका कुमारतुंगा यांच्यानंतर त्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या. तथापि, त्यांचे हे पद स्थिर होण्यासाठी एनपीपी पक्षाला २०२४ च्या संसदीय निवडणुकीमध्ये बहुमत मिळवणे आवश्यक होते. नोव्हेंबर महिन्यात संसदेच्या २२५ पैकी १५९ जागा जिंकून एनपीपीने हे बहुमत मिळवले. स्वतः हरिणी ‘कोलंबो डिस्ट्रिक्ट’ मतदारसंघातून ६,५५,२८९ मतांसह विजयी झाल्या. त्यामुळे, आता पुन्हा पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर हरिणी यांच्यामागे भक्कम संख्याबळ उभे राहिले आहे.

पंतप्रधानपदाबरोबरच हरिणी यांच्याकडे शिक्षण व उच्चशिक्षण मंत्रालयाचाही कार्यभार सोपपवण्यात आला आहे. हरिणी यांनी नेहमीच दर्जेदार आणि मोफत शिक्षणाचा पुरस्कार केला असून देशाच्या जीडीपीचा ६ टक्के वाटा शिक्षणावर खर्च करण्याबाबतही त्या आग्रही राहिल्या आहेत. आपले हे विचार कृतीत उतरवण्याची सुवर्णसंधी आता त्यांना उपलब्ध झाली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00