Home » Blog » Sondoli : सोंडोली कुस्ती मैदानात देवा थापा ‘रोज मर्क केसरी’चा मानकरी

Sondoli : सोंडोली कुस्ती मैदानात देवा थापा ‘रोज मर्क केसरी’चा मानकरी

by प्रतिनिधी
0 comments
Sondoli

सोंडोली :  प्रतिनिधी:  सोंडोली (ता. शाहुवाडी) येथे नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात रोज मर्क केसरीचा मानकरी नेपाळचा देवा थापा ठरला, तर सोंडोली केसरीचा किताब सोलापूरच्या सतपाल सोनटक्के याने पटकावला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. या मैदानाचे आयोजन ग्रामपंचायत सोंडोली, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ, रोज मर्क लिमिटेड आणि जाधव रोज मर्क स्पोर्ट्स लिमिटेड यांच्यावतीने संचालक दत्तात्रय जाधव यांनी केले होते.

रोज मर्क केसरीसाठी रात्री आठ वाजता  देवा थापा विरुद्ध  अमित लाखा यांची कुस्ती दुबईचे उद्योगपती काझी अब्दुल मतीन, रोज मर्क लिमिटेडचे संचालक पूर्वेश शेलटकर, आमदार सत्यजित पाटील, जि.प. सदस्य सर्जेराव पाटील पेरिडकर, कुस्ती संघटक दत्तात्रय जाधव आणि सरपंच भिमराव पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. सुरुवातीला सावधपणे खेळणारा देवा थापा दहाव्या मिनिटाला आक्रमक झाला. डाव-प्रतीडाव सुरू झाले आणि हवेतच अमित लाखाला धोबी पाट मारत त्याने विजय मिळवला. रोज मर्क केसरीच्या गदेचा मानकरी म्हणून त्याला गौरवण्यात आले. (Sondoli)

सोंडोली केसरी किताबासाठी सोलापूरचा सतपाल सोनटक्के विरुद्ध पुण्याच्या समीर शेख यांची कुस्ती सोंडोली ग्रामस्थांच्या हस्ते सुरू झाली. सतपाल सोनटक्के यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दहाव्या मिनिटाला समीर शेखवर ताबा मिळवला आणि पंधराव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवत सोंडोली केसरीचा मानकरी ठरला. रोख रक्कम व मानाची गदा रोज मर्क लिमिटेडतर्फे काझी अब्दुल मतीन, पूर्वेश शेलटकर आणि डी. आर. जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सोंडोलीच्या साहिल पाटील याने पुण्याच्या धनाजी पाटीलवर शानदार विजय मिळवला. त्यांना कुस्ती संघटक दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख इनाम देण्यात आले. प्रेक्षकाना चारही बाजूने कुस्ती व्यवस्थित दिसावी म्हणून मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. (Sondoli)

पंच म्हणून रामा माने, सर्जेराव पाटील, समिंदर जाधव, प्रकाश पाटील, शंकर पाटील, संजय जाधव, सुरेश सावंत, अमर पाटील, शंकर जाधव, सुरेश कदम आणि सचिन पाटील यांनी काम पाहिले.प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार सत्यजित पाटील, दुबईचे उद्योगपती काझी अब्दुल मतीन, पूर्वेश शेलटकर, जि.प. सभापती सर्जेराव पाटील, सभापती हंबीरराव पाटील, विजय खोत, जालिंदर पाटील आणि सरपंच भिमराव पाटील उपस्थित होते.

मैदानातील इतर विजयी मल्ल असे:

पै. कुमार पाटील, पै. सुरज पाटील (शित्तूर), श्री चोरमारे (चरण), अजय शेडगे (शेडगेवाडी), पै. अजित पाटील (सावे), पै. दत्ता बनकर (चिंचोली), सचिन महागावकर (पेरिड), पै. ओंकार जाधव (चिंचोली), आशुतोष लाड (येळापुर), प्रदीप पाटील, साहिल सावंत, यशराज जाधव, ओम कदम, जोतिराम पाटील (सोंडोली). महिला गटात पै. वैष्णवी पाटील (सोंडोली) यांनी पै. श्रुता कोळसे-चरण यांच्यावर विजय मिळवला. (Sondoli)

दुबईत कुस्ती मैदानाचे आयोजन करणार

“महाराष्ट्रातील मातीत खेळला जाणारा रांगडा खेळ पाहून आनंद झाला. लवकरच भारतीय पैलवानांच्या कुस्त्यांचे आयोजन दुबई शहरात करणार,” अशी माहिती उद्योगपती काझी मतीन यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00