Home » Blog » थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

MVA : दिल्लीतून समन्वयकाची जबाबदारी; शिवसेना-काँग्रेसमधील दरी दूर

by प्रतिनिधी
0 comments
MVA

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी तातडीने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यांशी समन्वय साधला. त्यानंतर जागावाटपाचे गाडे रुळावर आले असून, काही जागा कमी जास्त झाल्या, तरी दोन पक्षांतील रुंदावलेली दरी कमी करण्यात त्यांना यश आले आहे. (MVA)

राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीत पाचरण करण्यात आले होते. त्या सर्वांसमोर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली. या नव्या जबाबदारीने थोरात यांचे पक्षाअंतर्गत वजन वाढण्याचे सांगितले जाते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रे हाती घेत महाविकास आघाडीचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे आघाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या थोरात यांच्याकडे चर्चची सूत्रे सोपवली होती. आ. थोरात यांनी आज (दि.२२) सकाळी मुंबईत येत पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले.

आ. थोरात यांनी मातोश्रीवर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष ११० जागांवर लढणार होता. यापैकी ५ जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे, तर ठाकरे यांची शिवसेना ९० जागांवर लढणार होती. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात, तर शरद पवार गट ७५ जागांवर लढणार होता; मात्र आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे. (MVA)

हे जागावाटप करताना महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले जाते. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना जागा वाटपाच्या कारणावरून राऊत यांनी पटोले यांना लक्ष केले. पटोले यांनीही त्यांना उत्तर दिल्याने मोठे शाब्दिक युद्ध रंगले. त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले.

नंतर या उभयतांनी माध्यमांसमोर येत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे पान उलटत नाही तोच खा. राऊत दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही गुप्त भेट झाल्याची बातमी पसरली. एवढेच नाही, तर स्वबळावर लढण्याची भाषाही बोलली गेली. या प्रमुख घटनांसह अन्य छोटे मोठे खटके या दोन महत्त्वाच्या पक्षात उडाल्याने महाविकास आघाडी संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. राज्यातील या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना काल दिल्लीत पाचारण केले. सर्वांशी चर्चा केल्यानंतर समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला. थोरात यांनीही उत्साहाने नवी जबाबदारी स्वीकारत आज पवार यांची भेट घेतली. नंतर त्यांनी ठाकरे यांच्यांशीही चर्चा केली.

थोरात हे शांत, संयमी व तोलून मापून बोलणारे अनुभवी नेते समजले जातात. माध्यमस्नेही नसल्याने ते काहीसे मागे पडतात, अशी कबुली काँग्रेसमधील त्यांचे समर्थक देत असतात. २०१९ मधील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आकाराला आणण्याचे महत्त्वाचे काम खासदार राऊत, आमदार थोरात यांनी शरद पवार यांच्या साथीने केले होते. त्या वेळी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास सुरुवातीला प्रतिकूल असलेल्या दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींची मने वळविण्यात थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हीच बाब ओळखून आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना समन्वयाची जबाबदारी दिली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत परत विश्वासाचे वातावरण निर्माण करत पक्षासाठी यशस्वी वाटाघाटी करण्यात आता थोरात यांची खरी कसोटी लागणार आहे. (MVA)

पटोले हे मूलतः आक्रमक स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमधून त्यांचा झालेला काँग्रेस प्रवेश, विधानसभेचे तत्कालीन अध्यक्षपद आश्चर्यकारकरीत्या सोडणे आणि अन्य काही गोष्टींमुळे काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊत आणि त्यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे तात्कालिक कारण पटोले यांना महागात पडले आहे.

महायुतीचे घोडे अडले २५ जागांवर

महायुतीचे जागावाटप २५ जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ६० नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. या वेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00