कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान व्यवस्थेतील गलथान कारभारामुळे गोंधळात गोंधळ उडाला. दुबार नावे, मतदार यादीत नाव असणे, घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारी मतदान केंद्रे, बोटाची शाई जाणे, मशिन बंद होणे किंवा मतदानास विलंब लागणे यामुळे निवडणूक यंत्रणेचा गलथान कारभार पहायला मिळाला. याचा फटका काठावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना बसण्याची भिती व्यक्त केली आहे. निवडणूकीत पैशाचा पाऊस पडत असताना भरारी पथके आणि पोलिस यंत्रणेने डोळ्यावर पट्टी ओढून घेतली असल्याने निवडणूका पारदर्शी झाली नसल्याची प्रतिक्रिया प्रामाणिक मतदारांकडून होत आहे. (Confusion in voting arrangements)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासनाच्या गलनाथ कारभाराचा फटका मतदारांना बसला. मतदाराच्या घरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र असणे आवश्यक आहे आयोगाचा हा नियम असताना अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ७ मध्ये शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे वास्तव्य आहे. त्यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात आहे. या प्रभागातील सकोली कॉर्नर, ब्रह्मेश्वर पार्क, रंकाळावेश या प्रभागातील नागरिकांचे मतदान शनिवार पेठेतील खोल खंडोबा सभागृहात दोन मतदान केंद्रावर होते. या दोन केंद्रावर अंदाजे १६०० मतदार होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मतदानास येण्याचे टाळले. महिलांची मोठी दमछाक झाली. प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनाही असाच फेरफटका मारावा लागला. उत्तरेश्वर पेठेतील मतदारांना मतदान केंद्र शोधत शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयात यावे लागले. तर उत्तरेश्वर गवत मंडई परिसरातील नागरिकांना लक्षतीर्थ वसाहतीतल शाळेत मतदानाला जावे लागले. बिंदू चौक, आझाद चौकातील मतदारांना विद्यापीठ हायस्कूलमध्ये पायपीट करावी लागली. राजारामपुरी, टाकाळा, टेंबलाईवाडी, उपनगरात ही परिस्थित पहायला मिळाली. (Confusion in voting arrangements)
निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान चिठ्ठ्यांमध्ये खोली क्रमांक दिले नव्हते. अनेक ठिकाणी चुकीच्या मतदान केंद्राचे नाव होते. त्यामुळे मतदारांना हेलपाटे घालावे लागले. मतदान केंद्र सापडत नसल्याने अनेक मतदारांनी मतदान न करता घरचा रस्ता पकडला. त्यामुळे कमी टक्केवारी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पैशाचा वापर, पोलिस यंत्रणा ठप्प … उमेदवारांच्या कार्यालयातून थेट मतदारांना पैशाचे वाटप सुरू होते. त्या ठिकाणी मोदी गर्दी असूनही त्यांना हटकण्याचे सौजन्य पोलिसांना दाखवत आले नाही. निवडणूक केंद्राच्या बाहेरही मतदारांना पैसे वाटत असतानाही त्यावर कानाडोळा केला जात होता. उलट प्रामाणिक मतदारांकडे कागदपत्रांची पाहणी करुन कर्तव्य बजावत असल्याचा भास सर्वत्र पहायला मिळाला. पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करु नका असा वरुन आदेश आल्याची चर्चा पोलिस दलात सुरू होती. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पैसे वाटतांना कोणीही एकमेकांविरोधात तक्रार करायची नाही अशी दिलजमाई झाल्याची चर्चा होती. (Confusion in voting arrangements)