Home » Blog » Cine Stories: रेल्वे रुळावरील मानवी नातेसंबंधांच्या कहाण्या

Cine Stories: रेल्वे रुळावरील मानवी नातेसंबंधांच्या कहाण्या

by प्रतिनिधी
0 comments
Cine Stories

‘२७ डाऊन’ ही संजय आणि शालिनीची ही कथा आहे. पण त्या दोघांची नाहीच ती. ती एकट्या संजयचीच आहे.पण त्याचीही नाही. त्याचे आयुष्य ज्या भारतीय रेल्वेशी जखडले आहे, त्या रेल्वेच्या रुळांचीच कहाणी वाटते ती. आपल्या जीवनाचा प्रवाह मुक्त आहे असे वाटत असतानाच तो प्रवाह नियत रुळांवरचाच आहे, या जाणिवेने उद्ध्वस्त होणाऱ्या मानवी अगतिकतेची ती कहाणी उरते. रेल्वे रुळावर घडणाऱ्या अशा कथांविषयी… (Cine Stories)

-प्रमोद मुनघाटे

‘इजाजत’ ही तर एका रात्रीची गोष्ट आहे. सिनेमा सुरू होतो तेव्हा एक ट्रेन रात्री स्टेशनवर येते, आणि संपतो तेव्हा ट्रेन सकाळी निघून जाते. नसिरुद्दीन शहा त्या स्टेशनवर उतरतो तेव्हा त्याला रेखा भेटते, फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये. पाच वर्षांपूर्वी ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली असते. त्याची इजाजत न घेता. अचानक या पावसाळी रात्री त्याला भेटते. सुधा (रेखा) एकेकाळची पत्नी आणि महिंद्र (नसिरुद्दीन), आता कोणतेही नाते नसलेला एक परपुरुष यांच्यात त्या रात्री भावनांचे जे खेळ चालतात, ते फार हळवे आणि दुखरे असतात. या खेळातील त्यांचे अनोखे नाते नवरा-बायको-मित्र अशा कप्पेबंद नात्यांमध्ये बसवता येत नाही. सिनेमा संपतो तेव्हा रेखा आपल्या नव्याने लग्न केलेल्या नवऱ्यासोबत जाताना नसिरुद्दीन शहाची इजाजत घेते, गरज नसताना. अशा नात्याला नाव दिलेच पाहिजे का असा प्रश्न जणू गुलजार या प्रसंगातून प्रेक्षकांना विचारतात. गुलजार यांच्या ‘इजाजत’ सिनेमाची कथा अशी थोडक्यात अशी आहे.

सुधाजवळ महिंद्राच्या प्रत्येक समस्येची अडचणीची जणू किल्लीच आहे, जशी तिच्या व्हिआयपी सुटकेसची किल्ली आहे तशी. तिच्याकडे माचीसही आहे. महिंद्राच्या पुरुषी वृत्तीला फुलवणारी. (महिंद्र विचारतो तू स्मोकिंग करतेस का तर ती नाही म्हणते. त्याची विसरण्याची सवय आणि तिची जवळ बाळगण्याची सवय असं ती म्हणते) सुधाकडे शाल आहे, जी पावसात भिजलेल्या महिंद्रच्या कुडकुडत्या शरीरावर ती घालते आणि स्वतः मात्र रात्रभर जागत असते. टॉवेलने त्याचे केस पुसून देणे असो, त्याच्या उशाला पाण्याचा ग्लास ठेवणे असो. तो बाथरूममध्ये गेल्यावर त्याच्या सामानाची चौकीदारी करणे असो, की त्याला चहा बनवून देणे असो, सुधा अमृतमयी पत्नीच आहे. (Cine Stories)

विवाहसंस्थेतील साचेबंद नातेसंबंध गुलजार यांना सांगायचे आहेत का? तर नाही. पण काही विशिष्ट व्यक्तीरेखेतून माणसांच्या नात्यांच्या मुळांचा ते शोध घेऊ पाहतात. म्हणून त्या व्यक्तीरेखा प्रातिनिधिक नमुना ते होऊ देत नाहीत. त्यात काही तपशिलाचे अनोखे रंग ते भरतात म्हणून इजाजत सिनेमा ही एक कलाकृती बनते, तो स्त्री-पुरुष संबंधांच्या चर्चेचा विषय होत नाही.

महिंद्र मायात (अनुराधा पटेल) गुंतत जातो तशी मनस्वी सुधा त्याच्या आयुष्यातून निघून जाते. माया सुधाला आणण्यासाठी पचमढीला जाण्याचा हट्ट करते तेंव्हा महिंद्र तिला रागावतो आणि ती मध्यरात्री निघून जाते, पहाटे तिचा अपघात होतो आणि निष्प्राण देह महिंद्रच्या हाती लागतो. महिंद्राच्या आयुष्यात आता प्रेमाचे अमृतरूप असलेली सुधाही नसते आणि प्रेमाचे मायावी पाश आवळणारी मायाही नसते आणि अचानक त्या रात्री रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये त्याला सुधा भेटते. पण केवळ एका रात्रीसाठी. ती एक रात्र, त्या रात्रीत दोघांनी आठवलेले भूतकाळातील क्षण ही एक कविताच. त्या दोघांच्या आयुष्यातील आणि गुलजार यांनी प्रेक्षकांसाठी साकार केलेली. ती रात्र संपते. आणि सकाळी सुधाचा नवरा तिला घ्यायला येतो. तेंव्हा महिंद्र बघत असतो की सुधाने तिच्या नवऱ्यासाठी एक सिगारेटचे पाकीट घेतलेले आहे आणि त्याला रात्री सिगारेट पेटवण्यासाठी दिलेली माचीस ही सुद्धा तिच्या पतीसाठी आहे. सुधा एक आदर्श पत्नी आहे. पण हेही इतके सरळ चौकटबद्ध नाही. मनस्वी व्यक्तीच्या मनाचे धागे इतके सरळ नसतात.

एकदा सुधाला महिंद्राच्या शर्टाला अडकलेले मायाचे कानातील डूल सापडतात. त्यातून तो तिच्यात किती अडकला आहे, हे तिला जाणवते. त्याच दिवशी तो मायला घरी आणायचे ठरवतो. पण सुधा अमृतमयी पत्नी असली तरी एक मनस्वी व्यक्ती आहे, हे तो विसरतो. ‘पत्नी’ हे नातेसुद्धा प्रेमाच्या अनुभवाच्या आड येण्याचा काच असतो. ते अधिक काचले की ते नाते संपून जाते, हे तो विसरतो. (Cine Stories)

आणि रेल्वेच्या वेटिंग रूममधील रात्री सुधाने महिंद्रच्या अंगावर पांघरलेल्या शालीत तिचे इअररिंग अडकले असते. सकाळी महिंद्र सुधाला ते देतो. पण देताना तिला सांगतो, की जसे मायाचे कानातले अडकले होते, तसेच तुझ्या शालीत हे अडकले होते. महिंद्रसाठी दोन्ही अडकणे सारखेच होते का? तर होते. पण सुधासाठी ते नव्हते. तिचा नवरा तिला घ्यायला येतो तेंव्हा, त्याला तिची शाल दिसत नाही. मग ती महिंद्र जिथे उभा असतो, त्या खुर्चीवर त्याला दिसते. ती शाल सुधाची होती आणि सुधा आता महिंद्राची कोणीच नव्हती. तरीही सुधा त्याच्या अंगावर ती शाल पांघरते, हे नुसते दृश्य नाही, ती गुलजारची एक कविताच आहे. त्या एका रात्रीपुरती त्या शालीची ऊब महिंद्रला अनुभवता येते. फक्त त्या रात्रीपुरती. सुधाचा नवरा आश्चर्यचकित होत त्या खुर्चीवरील ती शाल उचलून घेतो.

००

‘२७ डाऊन’ ही संजय आणि शालिनीची ही कथा आहे. पण त्या दोघांची नाहीच ती. ती एकट्या संजयचीच आहे.पण त्याचीही नाही. त्याचे आयुष्य ज्या भारतीय रेल्वेशी जखडले आहे, त्या रेल्वेच्या रुळांचीच कहाणी वाटते ती. आपल्या जीवनाचा प्रवाह मुक्त आहे असे वाटत असतानाच तो प्रवाह नियत रुळांवरचाच आहे, या जाणिवेने उद्ध्वस्त होणाऱ्या मानवी अगतिकतेची ती कहाणी उरते.

‘२७ डाऊन’ हा सुंदर सिनेमा आहे. एक अविस्मरणीय अनुभव. ऐंशीच्या दशकातील अनेक समांतर हिंदी सिनेमे पाहिले. गोविंद निहलानी किंवा श्याम बेनेगल यांचे. पण अवतार कृष्ण कौल यांचा १९७४ चा हा ‘२७ डाऊन’ हा सिनेमा त्या सर्वाहून वेगळा वाटतो. अबोल आणि मौन धारण करणारा. हरिप्रसाद चौरासिया यांचे संगीत आहे पण ते जाणवत सुद्धा नाही.

१९७५ चा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला मिळाला, पण तसा तो प्रेक्षकांपासून दूरच राहिला असे वाटते. उत्कृष्ट छायाचित्रणाचा ही पुरस्कार याच सिनेमाला आहे. पण अवतार कृष्ण कौल यांचा नंतर कोणताही सिनेमा पुढे आला नाही. कारण एका अपघातात ते लगेच गेले. (Cine Stories)

‘२७ डाऊन’ ची मूळ कथा रमेश बक्षी यांच्या हिंदी कादंबरीवर आधारित आहे. पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन सर्वकाही अवतार कृष्ण कौल यांचेच. कादंबरी अजून वाचलेली नाही, पण एखादा प्रतिभावंत पटकथा, दिग्दर्शन आणि स्क्रीन प्लेची जादू कशी निर्माण करू शकतो, या अजोड नमुना म्हणून ‘२७ डाऊन’ कडे पहावे असे वाटते.

भुसावळमध्ये सुरु झालेली कथा कल्याण, कुर्ला, जळगाव अशी वळणे घेत वाराणशीपर्यंत येते. मुंबईची लोकल ट्रेन आणि रेल्वेचे सगळे जीवन हाच या सगळ्या सिनेमाचा कॅनव्हॉस आहे. १९७४ च्या या सिनेमातील कृष्णधवल दृश्ये पाहताना आज जीवनाचा गंभीर विचार करणाऱ्या एखाद्या कवितेसारखा अनुभव देतो. एम के रैना यांचा संजय आणि राखीने साकारलेली शालिनीची भूमिका खूप खूप शांत आहे. कुठेही भडक संवाद नाही, भावनांचा उद्रेक करणारे प्रसंग नाहीत. संजय आणि शालिनी यांच्या लोकलमधील, व्हीटी स्टेशनवरील, चौपाटीवरील भेटी, शालिनीच्या कुर्ल्याच्या रुमवरील चहा, संजयचे रेल्वेतील भटकणे हे सगळे आज पाहणाऱ्या प्रेक्षकांना सत्तरीच्या दशकातील महानगरी जीवनाचे असे दर्शन घडवते, जे इतर कोणत्याच हिंदी सिनेमात सहसा येत नाही.

पण त्यापेक्षाही रेल्वेचे रूळ आणि मानवी आयुष्य यांच्यातील एक गूढ नाते या सिनेमातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे, तोही तसा दुर्मीळच म्हणता येईल.

००

‘नायक’मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला बंगाली सिनेमानट अरिंदम मुखर्जी (उत्तम कुमार) एक मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत असतो. त्याच्या समोरच्या बर्थवर एक आजारी मुलगी असते. रात्री सगळे झोपले असताना ती जागी असते म्हणून तो तिची विचारपूस करतो. नंतर स्वतःच्या पॉउचमधून झोपेच्या गोळ्यांची एक स्ट्रीप काढून एक गोळी खातो. ती मुलगी आश्चर्यचकित होते. ती विचारते तुम्ही आजारी आहात का? कारण ती आजारी असल्याने तिला झोप येत नाही, आणि ज्याला ती हिरो समजत असते तो सुद्धा एका अर्थाने ‘आजारी’च असतो. हा आजार असतो एकटेपणाचा, वैफल्याचा व नैराश्याचा.

सत्यजित राय यांचा ‘नायक’ सिनेमा हा १९६६चा. प्रसिद्धीच्या झोतात असलेले कलावंत सामान्य प्रेक्षकांच्या मनात असलेल्या त्यांच्या ‘नायक’ या प्रतिमेचे बळी असतात. स्वतःच्या खासगी आयुष्यातील कुसळासारखे सलणारे शल्य लपवून हिरोची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतात. पण कधीतरी त्या प्रतिमेचा मुखवटा गळून पडतो आणि नायकाचा विद्रूप-दु:खी चेहरा उघडा पडतो, इतका की त्याची दया यावी. अरिंदम मुखर्जीची अशीच दया अदिती सेनगुप्ताला (शर्मिला टागोर) येते. अदिती एका मासिकाची संपादक असते आणि ती फर्स्ट क्लासच्या त्याच डब्यात असते, ज्यातून अरिंदम मुखर्जी दिल्लीला निघाला आहे.

‘नायक’ या संपूर्ण सिनेमात ट्रेनच्या त्या फर्स्ट क्लासच्या त्याच डब्यात घडलेल्या घटना आहेत. अरिंदमचे सगळे सहप्रवासी अप्रत्यक्षपणे त्याच्या नायकपदाला जणू वेगवेगळ्या रीतीने आव्हानच देणार आहेत. अदिती डब्याच्या रेस्टॉरंटमध्ये त्याची मुलाखत घेते. सुरवातीला अरिंदम नकार देतो कारण त्याला त्याचे खाजगी आयुष्य सार्वजनिक करायचे नसते. पण सकाळपासून भेटलेली माणसे आणि सकाळच्या पेपरमध्ये त्याच्याविषयी छापून आलेल्या बातम्यांमुळे आलेला ताण असह्य झाल्याने तो परत तिच्याशी स्वतःहून बोलू लागतो. ती त्याच्या नकळत टिपणे घेऊ लागते. अरिंदम बोलता बोलता स्वत:च्या आत डोकावू लागतो. त्याचा अभिनय क्षेत्रातील गुरू शंकरने त्याला सिनेमात न जाण्याचा सल्ला धुडकावून आपण चूक केली असे त्याला वाटू लागते. त्याचा कॉलेजमधील एक डाव्या चळवळीतील एक मित्र बिरेश अचानक एक दिवस येऊन त्याला एका कामगारांच्या संपाच्या निदर्शनात घेऊन जातो. तिथे अरिंदमने फक्त त्यांचे मनोबल वाढवणारे भाषण करावे अशी अपेक्षा असते. पण तो नाकारतो. त्याला त्याच्या प्रतिमेसाठी योग्य वाटत नाही. तो बिरेशला पैसे देऊ पाहतो. या घटनेची त्याला कायमची बोच असते. अदितीशी बोलताना अशा अनेक व्यक्तींची त्याला आठवण येते. तो झोपायला जातो तेंव्हा त्याला प्रोमिला (सुमिता सन्याल) आठवते. तिच्यावर त्याचा जीव जडला असतो. मग त्याला एक स्वप्न पडते. स्वप्नात तो शुटींगमध्ये असतांना प्रोमिला त्याला साद घालते. तो तिच्या मागे जातो. पण पुढे तिच्या नवऱ्याशी त्याची बाचाबाची होते. प्रोमिला त्याच्यासाठी जणू एक दु:स्वप्न ठरली असते. (Cine Stories)

अरिंदमला ट्रेनमध्ये झोप येत नाही. डोळा लागतो तेंव्हा भयंकर स्वप्नं पडतात. सर्वत्र नोटांचा खच पडलेला आहे. दलदल झाली आहे. त्या नोटांच्या दलदलीत तो आता पूर्ण फसला आहे. नंतरच्या एका स्वप्नात तो प्रोमिलाच्या मागे मागे जातो आणि तिचा नवरा त्याच्यावर हल्ला करतो. अरिंदम अस्वस्थ होतो. तो टॉयलेटमध्ये जाऊन दारू पितो. लाखो लोकांच्या मनात एक हसतमुख हिरो म्हणून प्रतिमा असलेला अरिंदम हा किती केविलवाणा आहे, असे वाटून अदिती त्याच्यासंबंधी काढलेली टिपणे फाडून टाकते. तिला त्याची दया येते. अखेर झोपेच्या गोळ्या घेताना त्याच्या समोरच्या बर्थवरील ती मुलगी त्याला विचारते तुम्हाला झोप का येत नाही? या एका प्रश्नाने नायकपद म्हणजे जणू एक मोठा आजार आहे, याची त्याला स्वतःला जाणीव होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00