Home » Blog » जडेजाचे शतक हुकले, बुमराहचा ‘चौकार’; भारताची मजबूत पकड

जडेजाचे शतक हुकले, बुमराहचा ‘चौकार’; भारताची मजबूत पकड

भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या असून भारताची एकूण आघाडी ३०८ धावांची झाली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २२७धावांची आघाडी मिळाली.

by प्रतिनिधी
0 comments

चेन्नई : भारत -बांगलादेश कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ८१ धावा केल्या. शुभमन गिल ३३ आणि ऋषभ पंत १२ धावांवर खेळत आहेत. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या असून भारताची एकूण आघाडी ३०८ धावांची झाली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २२७धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात तिसऱ्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या चेंडूवर झाकीर हसनकरवी झेलबाद झाला. रोहितने ५ धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद झाली. त्यानंतर भारताने ६७ धावांवर विराट कोहलीची विकेटही गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीने ३७ चेंडूंचा सामना करत १७ धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर पंत आणि शुभमन यांनी सावध खेळी करत धावफलक हलता ठेवला.

बांगला देशचा पहिला डाव

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचे सर्व फलंदाज १४९ धावांतच बाद झाले. फलंदाजीमध्ये शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बांगलादेशची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. अवघ्या ४० धावांत त्यांच्या ५ फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या. बांगलादेशला डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने झटका दिला. शदमान इस्लामला (१२) बुमराहने क्लीन बोल्ड केले. यानंतर आकाश दीपने चेंडूसोबत जादू दाखवत लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन (३) आणि मोमिनुल हक (२) यांना क्लीन बोल्ड केले. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो (२०) मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विराट कोहलीकरवी स्लिपमध्ये बाद झाला. यानंतर काही वेळातच अनुभवी मुशफिकुर रहमानने (८) बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल दिला. अशा प्रकारे बांगलादेशी संघाची धावसंख्या 40/5 झाली.
यानंतर शाकिब अल हसन आणि लिटन दास (२२) यांनी ५१ धावांची भागीदारी केली. जडेजाच्या चेंडूवर लिटन दासला बदली खेळाडू ध्रुव जुरेलने झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात जडेजाने शकीबला (३२) पंतकरवी झेलबाद केले. बुमराहने हसन महमूद (९) आणि तस्किन अहमदला आपला बळी बनवले. नाहिद राणाच्या (११) रूपात सिराजने बांगला देशची शेवटची विकेट घेतली.

भारताचा पहिला डाव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताकडून रविचंद्रन अश्विन (११३) आणि रवींद्र जडेजा (८६) यांनी शानदार फलंदाजी केली. तर बांगलादेशकडून चोवीस वर्षीय हसन महमूदने सर्वाधिक पाच बळी घेतले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या तीन विकेट 34 धावांवर पडल्या. रोहित (६), गिल (0), कोहली (६) या तिन्ही आघाडीच्या फलंजादांना हसन महमूदने बाद केले. ऋषभ पंत (३९) लयीत दिसत होता, पण तोही हसन महमूदचा बळी ठरला. यशस्वी जैस्वाल एका बाजूने लढत होता. अखेर तोही ५६ धावांची खेळी करून बाद झाला. त्याला नाहिद हुसेनने शादमान इस्लामकरवी झेलबाद केले. केएल राहुल ५२ चेंडूत १६ धावा करून तंबूत परतला. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय डावाची सुत्रे आपल्या हाती घेत विक्रमी कामगिरी केली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने आपला डाव ८६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली परंतु, त्याला शतक झळकवता आले नाही. तो तस्किन अहमदच्या चेंडूवर लिटन दासकरवी झेलबाद झाला. जडेजा बाद झाल्यावर टीम इंडियाची धावसंख्या ३४३/७ अशी होती. जडेजा आणि अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी रचली. जडेजानंतर आकाशदीप फलंदाजीला आला, काही आकर्षक शॉट्स खेळून तो १७ धावांवर बाद झाला. त्याला तस्किन अहमदने शांतोकरवी झेलबाद केले. आकाशदीप बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या ३६७/८ अशी झाली. यानंतर अश्विन (११३) धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ जसप्रीत बुमराहही (७) तंबूत परतला. अशाप्रकारे भारतीय संघाच्या धावफलकावर ३७६ धावा झळकल्या. गोलंदाजीमध्ये बांगला देशच्या हसन महमूदच्या पाच बळींसह तस्कीन अहमदने तीन बळी घेतले. तर मेहदी हसन मिराज आणि नाहिद राणा यांना प्रत्येकी एक बळी घेतला. भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा हसन महमूद बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00