जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून त्यांच्यासाठी ‘दिवे’ लावायचे? मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’ आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. (Congress State President Sapkal criticizes the PM)
मोदी सरकारच्या कामांवर जनता असमाधानी
मोदींनी सार्वजनिक जीवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचे आवाहन भाजपाने केले आहे. त्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे, लाखो तरुण बेरोजगार आहेत, शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी पेपरफुटीने हैरान आहेत, छोटे व मध्यम व्यापारी जाचक करामुळे त्रस्त आहेत. समाजातील एकही घटक मोदी सरकारच्या कामावर समाधानी नाही, असे असताना वाढदिवस कसले साजरे करता? असा सवाल सपकाळ यांनी केला. (Congress State President Sapkal criticizes the PM)
देशांसाठी मोदी घातक पंतप्रधान
मोदींनी आधी गुजरातची वाट लावली आणि त्यानंतर २०१४ पासून अख्या देशाची वाट लावत आहेत अशी टीका करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मोदींचा कार्यकाळ हा सर्वात वाईट कार्यकाळ असून देश २५ वर्षे मागे गेला आहे. जगात भारताची नाच्चकी होत आहे. ते अमेरिकेसमोर सरंडर आहेत तर चीनला लाल डोळे करून दाखवण्याची वल्गना हवेत विरली आहे, रुपया ९५ पैशांवर गेला, देशावर कर्जाचा डोंगर रचून ठेवला आहे. केवळ हिंदू मुस्लीम करून समाजात विष पेरण्याचे काम मोदी यांच्या कार्यकाळात झाले आहे. मोदींनी दिलेले एकही आश्वासन पर्ण केले नाही. फक्त फेकाफेकी करणे हीच त्यांची कामगिरी असून देशासाठी मोदी अत्यंत घातक पंतप्रधान ठरले आहेत. देशाला पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठा कालावधी लागेल, असे सपकाळ म्हणाले.
जीव गेल्यावर शेतकऱ्याला मदत मिळणार का?
‘राज्यातील अनेक भागात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे, शेतातील पिकं करपून गेली आहेत, शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहिले नाही. शेतकरी मोठ्या संकटात आहे पण भाजपा महायुती सरकार मात्र अद्याप मदत देण्यासाठी काहीच करत नाही. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या चर्चा झोडल्या पण बळीराजाला मदत करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकारची मदत काय शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर मिळणार आहे का? कर्जमाफी जाहीर केली तिही फसवी निघाली. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी असून या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आहे. सरकारने ‘अभ्यास’ करण्यात वेळ न घालवता तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. (Congress State President Sapkal criticizes the PM)
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची भूमिका निषेधार्ह
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना राज्य सरकारने दिलेली आश्वासन काय होती? हे जाहीर करा. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ तेंव्हाच्या मुख्यमंत्री यांनीही घेतली होती.आता गणेशोत्सवाचे कारण सांगून हे लोक लपण्याचे कारण सांगत आहेत, फडणवीस सरकार हेच महाराष्ट्रावरचे मोठे विघ्न आहे. फडणवीस हे केसाने गळा करण्यात माहिर आहेत, त्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करावी. जातीनिहाय जनगणनेत जातीचा कॉलम टाकावा ही आमची भूमिका आहे तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी ही काँग्रेसची भूमिका आहे असे सपकाळ यांनी सांगितले. (Congress State President Sapkal criticizes the PM)