नागपूर : प्रतिनिधी : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असताना दुसरीकडे प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनांनी नागपूरात चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने परिस्थिती निवळण्यासाठी महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीष महाजनाकडून माजी आमदार बच्चू कडूंची मनधरणी सुरू केली आहे. मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडूशी संपर्क साधून मुंबईत बैठकीस यावे अश विनंती केली. त्यावर बच्चू कडू यांनी मुंबईला भेटीसाठी बोलावून आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का असा सवाल बावनकुळेंना केला. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेवराव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांनी पाठिंबा देत नागपूरच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Bawankule’s call to Kadu)
शेतकरी कर्जमुक्ती मागणीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनकांमुळे हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून मनधरणी सुरू केली आहे.
मुंबईऐवजी बैठक नागपूरला घ्या
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी कडू यांनी फोनवरून बावनकुळेंना म्हणाले कोणतेच मंत्री यायला तयार नाहीत. मंगळवारी आम्ही मुंबईला आलो असतो तर आमचा मोर्चा पांगला असता. त्यामुळे हे आंदोलन सोडून आम्ही मुंबईला बैठकीसाठी कसे येऊ शकतो, तुम्ही ही बैठक नागपूरला लावा. नागपूरला मंत्रालय आहे, त्यामुळे इथे बैठक घ्या. कारण इतर ठिकाणी तुम्हाला जाता येते, जातीवादी किंवा इतर मोर्चामध्ये जाता येते, मग शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले? असा सवाल यावेळी बच्चू कडूंनी बावनकुळेंना विचारला. (Bawankule’s call to Kadu)
अपंगांचे फक्त हजार रुपयेच वाढवले
लाखो शेतकरी इथे असताना आम्ही मुंबईला गेलो असतो तर काय संदेश गेला असता? सरकारचे प्रतिनिधी काय येत नाहीत, असा प्रश्न कडू यांनी बावनकुळेंना केला. मी मुख्यमंत्री फडणवीसांना सविस्तर मेसेज पाठवला आहे. मागे जुलै महिन्यात बैठक झाली. तुमच्यासोबत सुद्धा बैठक झाली. तेव्हा पण काहीच झाले नाही. दोन बैठकी आधीच झाल्या आहेत. पण निर्णय कुठे झाले आहेत? अपंगांचे फक्त हजार रुपये वाढवण्यात आले आहेत, असे म्हणत कडूंनी बावनकुळेंवर संताप व्यक्त केला.
बैठकीच्या नावाखाली आंदोलन मोडीत काढण्याचा डाव
बच्चू कडू म्हणाले, आम्ही बैठकीसाठी मुंबईला येऊ शकत नाही. हे आंदोलन सोडून मुंबईला कसे येऊ? कारण मुंबईला विमानाने जायला दोन तास, बैठकीसाठी दोन तास, पुन्हा यायला दोन तास म्हणजे मग आमचा पूर्ण दिवस जाईल आणि उद्या जर आंदोलन हातात नाही राहिले तर काय करायचे? बैठक घ्यायला आम्ही तयार आहोत. पण ती इथे नागपूरला घ्या. उद्या शेतकऱ्यांनी काही केले? काही प्रॉब्लम झाला? कोणाला अटक झाली? उद्या वातावरणाचा फरक आला तर आम्ही काय करायचे? त्यामुळे बैठकीच्या नावाखाली तुमचे आमचे आंदोलन मोडीत काढायचे आहे का? असे एक ना अनेक सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केले आहेत.
शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य करणार?
मुंबईला बैठक घेण्यापेक्षा बैठक नागपूरला घ्या. इथे मंत्रालय आहे आणि बावनकुळे तुम्ही तर विदर्भाचे प्रेमी आहात. मग हा निर्णय इथे झाला तर काय प्रॉब्लम आहे? त्यामुळे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांच्यापैकी कोणत्या मागण्या मान्य करणार आहात? हे तुम्ही सांगा. कारण मग रेल्वे रोकोचा तसा निर्णय घेता येईल, असे थेटपणे बच्चू कडू यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोनवरून सांगितले आहे. (Bawankule’s call to Kadu)