नवी दिल्लीः गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला विरोध करणा-या पुण्यातील विद्यानंत बापट यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच राजधानी दिल्लीत गोंगाटाला विरोध करणारे मणिपुरी (Manipur) संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांची जमावाकडून हत्या झाली. या घटनेमुळे राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हादरून गेला असून झुंडीच्या उन्मादांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रात जशा प्रतिक्रिया उमटल्या त्याहून तीव्र प्रतिक्रिया देशपातळीवर उमटत आहेत. गेली काही वर्षे धगधगत असलेल्या मणिपूरच्या जखमा त्यामुळे पुन्हा तीव्र झाल्या आहेत. दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच अमित शाह यांच्या गृहमंत्री म्हणून सक्षमतेचा मुद्दाही पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे.
दक्षिण-पूर्व दिल्लीच्या किलोकरी गावात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह (Chongtham Vikram Singh) यांच्या घरासमोर असलेल्या एका ढाब्याबाहेर रविवारी रात्री उशिरापर्यंत मोठा गोंधळ आणि गोंगाट सुरू होता. त्यामुळे त्रस्त झालेले सिंह आवाज कमी करा म्हणून सांगण्यासाठी घराबाहेर आले. त्यावेळी ढाब्याशी संबंधित कर्मचारी तेथे गोंगाट करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जमावाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
सिंह यांनी त्यांना गोंधळ थांबवण्यास सांगितल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर एका समूहाने त्यांना घेरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी इमारतीच्या जिन्यापर्यंत सिंह यांचा पाठलाग करत केला आणि तेथेही त्यांना मारहाण केली, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. हल्ल्यात सिंह गंभीर जखमी झाले. त्यांचा मुलगा याइफाबा यांनी त्यांना उपचारासाठी होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मणिपुरी संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांची जमावाकडून हत्या झाली.
पोलिसांना या घटनेची माहिती सोमवारी पहाटे दीड वाजल्यानंतर मिळाली. सनलाइट कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात जखमी व्यक्तीला जिन्यावरून खाली आणले जात असल्याचे दिसत असून, कथित हल्लेखोर जिन्यातून बाहेर जाताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिस संपूर्ण घटनाक्रमाची सांगड घालत आहेत.
अल्पवयीन मुलासह आठ अटकेत
दिल्ली पोलिसांनी एका पंधरा वर्षाच्या मुलासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम १०३(२) हे समूहाकडून करण्यात आलेल्या हत्येशी संबंधित आहे, तर कलम ३(५) सामायिक हेतूने केलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे.
मणिपूरच्या संगीतविश्वात लोकप्रिय
चोंगथाम विक्रम सिंह हे मणिपुरच्या पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातील लोकप्रिय नाव होते. त्यांनी Ultra Vires, Phoenix आणि Eastern Dark या बँड्ससोबत गिटारवादक म्हणून काम केले होते. नंतर त्यांनी दिल्लीमध्ये संगीत शिकवण्यास सुरुवात केली. गेल्या सुमारे १७ वर्षांपासून ते खासगी संगीत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी दिल्लीत स्वतःचे संगीत विद्यालयही सुरू केले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीतील मणिपुरी समुदायासह पूर्वोत्तर राज्यांतील नागरिक आणि विविध नागरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली.
सोमवारी मणिपुरी समुदायानेकिलोकरी गावात कँडल मार्च काढून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. दिल्ली विद्यापीठाच्या North East Students’ Society या संघटनेने घटनेचा निषेध केला असून जलद आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली.
मणिपुरी समुदायात अस्वस्थता
या हल्ल्यामागे वांशिक पूर्वग्रह होता का, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी हल्ल्याचा वांशिक हेतू असल्याचे सिद्ध झालेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर दिल्लीतील मणिपुरी समुदायात तीव्र अस्वस्थता आहे. कुटुंबीय आणि समुदायाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे केवळ आरोपींना अटक करण्याची नव्हे, तर न्याय आणि सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे.
कुटुंबातील एका सदस्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. त्यातून आरोपींची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. पूर्वोत्तर भारतातील नागरिकांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराकडे आणि कथित वांशिक भेदभावाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्याकडून निषेध
या घटनेबाबत राजकीय पातळीवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांना त्यांनी याबाबत प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, देशाच्या राजधानीत एका व्यक्तिची त्यांच्या स्वतःच्या घराबाहेर हत्या झाली. अशा अनेक घटनांनंतर दिल्लीत राहणाऱ्या पूर्वोत्तर भारतातील प्रत्येक कुटुंबाला आज —“आपण येथे सुरक्षित आहोत का?” असे स्वतःलाच विचारावे लागत आहे.
अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस पूर्वोत्तर भारतातील नागरिकांविरोधात वाढत असलेली ही अराजकता रोखण्यासाठी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींना न्यायाच्या कक्षेत आणण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनीही या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. दिल्लीतील मणिपुरी संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांच्या दुःखद मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हल्ल्याच्या घटनेने आपण अत्यंत व्यथित झाल्याचे त्यांनी म्हटले.
या घटनेने राजधानीत पूर्वोत्तर भारतातील नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या क्रूरतेच्या वेदनादायक जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत, असे संगमा यांनी म्हटले. दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
मणिपुरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि विद्यमान मुख्यमंत्री के.एच. युमनाम यांनीही सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. संगीत क्षेत्रात आणि मणिपुरच्या सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेल्या योगदानाचे आदराने स्मरण केले जाईल, असे त्यांनी म्हटले.
अमित शाह निशाण्यावर
राजधानीतील ही घटना गंभीर मानली जाण्याची अनेक कारणे आहेत. केवळ एक हत्येची घटना एवढेच तिचे म्हत्त्व नाही. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर राजधानी दिल्लीतल्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पाठोपाठ ही घटना झाली आहे. एका बाजूला रात्रीच्या गोंगाटावरून सुरू झालेल्या वादाचे हिंसक हत्येत रूपांतर झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला राजधानीत पूर्वोत्तर भारतातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. असे दोन अँगल असल्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. राहुल गांधी यांनी आधीच अमित शाह यांना निशाण्यावर घेतले असताना या घटनेमुळे गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणी वाढल्या असल्याचेही मानले जाते.