पुणे : प्रतिनिधी : दिवगंत काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड (वय ५३) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्या त्या भगिनी होत. (Bharti Lad)
भारती लाड यांना १४ एप्रिल रोजी चक्कर आल्याने त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी पुण्यात नेण्यात आले. पुण्यात भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. (Bharti Lad)
कुंडल गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा ऋषिकेश आणि रोहन यांनी भडाग्नी दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुहास बाबर, आमदार अरुण लाड, माजी आमदार मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, संग्रामसिंह देशमुख, मोहनराव कदम, डॉ. शिवाजीराव कदम, आदी उपस्थित होते. (Bharti Lad)
भारती लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ मध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे झाला. पंतगराव कदम यांचा संघर्षमय काळ त्यांनी पाहिला होता. पंतगरावांनी कन्या भारती यांच्याच नावे भारती विद्यापीठासह सर्व संस्थाचे जाळे विणले होते. सांगली जिल्ह्यातील पलूस कुंडल येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक महेंद्र लाड यांच्याशी त्यांचा १९९३ मध्ये विवाह झाला. भारती लाड यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्था उदयास आल्या. राजकीय आणि सामाजिक वारसा जपत भारती लाड यांनी आयुष्यभर सामान्य राहणीमान जपले. महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करुन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. (Bharti Lad)
हेही वाचा :