जमीर काझी : मुंबई : दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेवेळी प्रवाश्यांनी लोकलमधील साखळी ओढली होती. मात्र मोटरमनने ट्रेन न थांबविता तसेच पुढे नेली. जर ती वेळीच थांबवली गेली असती तर प्रवाशांचे प्राण वाचले असते, असा दावा प्रत्येकदर्शी साक्षीदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सुरक्षित प्रवासासाठी कितपत खबरदारी घेते?, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे (Mumbra local accident)
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल अपघातात काल चार जणांचा जीव गेला. तर १३ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातातील चार जणांचा मृत्यू टाळता आला असता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. एका हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा नाहक जीव गेल्याचा दावा करण्यात येत आहे. (Mumbra local accident)
कसारा ते सीएसएमटी जलद लोकलमधील काही प्रवाशी मुंब्रा स्थानकाजवळ पोहचत असताना सीएसएमटीकडून येत असलेल्या दुसऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची बॅग लोकलच्या दारात उभे असलेल्या प्रवाशाला लागल्याने १३ जण खाली पडले. त्यावेळी काही प्रवाशांनी तातडीने तीन ते चार वेळा चेन खेचली. तरीही ट्रेन थांबली नाही. मोटरमनने थेट ठाण्याला नेऊनच लोकल थांबवली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या केतन सरोज याचा मित्र आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी दीपक शिरसाठ याने ही माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, दोघेही उल्हासनगरातील रहिवासी असून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमध्ये कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजता शहाड येथून कसारा सीएसएमटी फास्ट लोकल पकडली. डोंबिवलीत आणि दिव्यात गर्दी झाली. मुंब्रा काही अंतरावर अरुंद वळणावर लोकलमधील बाजूचे अंतर कमी होऊन दोन्ही लोकलमधील दारात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. लोकलमधील एका प्रवाशाची बॅग विरुद्ध दिशेने येणाऱ्या तिसऱ्या डब्यातील प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी पडले. केतन आणि दीपकचा हा प्रवास अखेरचा ठरला. प्रवाशी पडले तेव्हा, लोकलमधील प्रवाशांनी चेन खेचली होती. पण तरीही मोटरमॅनने लोकल थांबवली नाही असा आरोप त्याने केल्याने या बाजूने तपासाची मागणी करण्यात येत आहे. (Mumbra local accident)
मोटरमनने स्थितीचे गांभीर्य ओळखत वेळेवर ट्रेन थांबवली असती तर जीव वाचले असते असे प्रत्यक्षदर्शीनी सागितले. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकेचा अभाव होता. तर घटनास्थळावरून काहींना रुग्णवाहिका मिळाली.तर काहींना टेम्पोतून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.
मनसेचा ठाणे रेल्वे स्थानकात मोर्चा
रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा, गलथपणाच्या निषेधार्थ मंगळवारी मनसेच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकावर मोर्चा काढण्यात आला. लेट ट्रेन, रेल्वे स्थानकात जिन्यालगतच खाद्य पदार्थाचे स्टॉल, पेपर स्टॉल याबाबत आक्षेप घेत अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला. याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.