ब्रुसेल्स : दहशतवादी हल्ल्यांनी चिथावणी दिल्यास भारत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करेल, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (१० जून) दिला. पहलगाम हल्ल्यासारख्या क्रूर कृत्यांसाठी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांची चांगलीच अद्दल घडवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Jaishankar warns)
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेनंतर जवळपास एक महिन्यांनी जयशंकर युरोपला भेट देत आहेत. त्यांनी सांगितले आहे की पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना खुलेआम प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना भारतावर हल्ले करण्यासाठी मोकळे सोडत आहे. (Jaishankar warns)
‘‘आम्ही हे कदापी सहन करणार नाही. म्हणून त्यांना आमचा जाहीर इशारा आहे की एप्रिलमध्ये त्यांनी (दहशतवादी) केलेल्या क्रूर कृत्यांसारखेच कृत्य तुम्ही करत राहिलात तर आम्ही सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. तो सूड दहशतवादी संघटना आणि दहशतवादी नेतृत्वाविरुद्ध असेल,’’ असे त्यांनी सोमवारी ‘पॉलिटिको’ला सांगितले.
‘‘ते (दहशतवादी) कुठे आहेत याची आम्हाला पर्वा नाही. जर ते पाकिस्तानच्या आत असतील तर आम्हीही पाकिस्तानच्या आत घुसू,’’ असे ते पुढे म्हणाले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. (Jaishankar warns)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस चाललेल्या युद्धाचा शेवट १० मे रोजी झाला. दोन्ही बाजूंच्या लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लष्करी कारवाई थांबवण्याचा करार दोन्ही देशांनी केला आहे.
जयशंकर यांनी इशारा दिला की संघर्षाची मूळ कारणे अपरिवर्तित आहेत.
‘‘पाकिस्तान हा एक देश आहे जो देशाचे धोरण म्हणूनच दहशतवादाचा वापर साधन म्हणून करण्यात खूप गुंतलेला आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस
लोकसभा उपाध्यक्ष निवडीसाठी मोदींकडे काँग्रेसचा आग्रह