कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी केल्यानंतरही मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. (Shilpa Khot elected as Kolhapur ZP President)
अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला
जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकी सव्वा वर्षे विभागून देण्याचे निश्चित झाल्यानंतर पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेत एकूण ६८ सदस्य असून महायुतीकडे ५१ सदस्य संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधीक वीस दस्य आहेत. भाजपचे बारा आणि जनसुराज्यचे सहा असे १८ सदस्य असल्याने अध्यक्षपद भाजपला मिळावे असा आग्रह होता. अखेर कोल्हापूर महानगरपालिकेप्रमाणे सर्वात जास्त सदस्य असलेल्या पक्षाचा महापौर हा पॅटर्न जिल्हा परिषदेत लागू करत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेवर दावा सांगितला. राष्ट्रवादीची मागणी मान्य होऊन त्याचा अध्यक्ष होणार हे निश्चित झाले. (Shilpa Khot elected as Kolhapur ZP President)
राष्ट्रवादीच्या आवाहनानंतर काँग्रेस उमेदवारांची माघार
अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदासाठी रसिका पाटील यांचा तर उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोधकांना बिनविरोध निवडीचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार रसिका पाटील, संभाजी पाटील यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील हे मंत्री मुश्रीफांच्या मैत्रीला जागले असल्याची चर्चा सुरू होती.
मुश्रीफांनी अध्यक्षपद कागल तालुक्यातच ठेवले
राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वोसर्वा मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याच तालुक्यात कायम ठेवले आहे. कागल तालुक्यातून सेनापती कापशी येथून विजयी झालेल्या शिल्पा खोत यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली आहे. उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून तानाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गडमुडशिंगीतून पाटील विजयी झाले आहेत. ते आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक आहेत.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून कागल तालुक्यातून शोभाताई फराकटे, गडहिंग्लज तालुक्यातून शैलजा पाटील, पन्हाळा तालुक्यातून पूजा पाटील यांच्या नावांची चर्चा होती. पण मुश्रीफांनी शिल्पा खोत यांच्या नावाला पसंती दिली. (Shilpa Khot elected as Kolhapur ZP President)