नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापले आहे. त्यावर भाजपने प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव त्यांनी भारतीय नागरिक होण्यापूर्वीच मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा दावा भाजपने बुधवारी १३ ऑगस्ट केला आहे. (Bjp alleges Sonia)
भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, श्रीमती गांधी यांचे नाव १९८० मध्ये मतदार यादीत आले आणि १९८२ पर्यंतच त्यांचे नाव यादीत राहिले. म्हणजे त्या भारतीय नागरिक होण्याच्या एक वर्ष आधीच त्यांचे नाव यादीत आले होते.
सोनिया गांधींवर प्रथम भाजप नेते अमित मालवीय यांनी आरोप केले. ते म्हणाले होते की, ‘‘भारताच्या मतदार यादीत सोनिया गांधींचे नाव समाविष्ट होत असताना त्यांनी निवडणूक कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केल्याचे दिसते. अपात्र आणि बेकायदेशीर मतदारांना नियमित करण्याची राहुल गांधींची आवड आणि विशेष सघन सुधारणा (SIR) ला त्यांचा विरोध हे कदाचित यामुळेच होत असल्याचे स्पष्ट होते.’’
मालवीय यांच्या मते, सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० मध्ये यादीत आले होते. म्हणजे त्या भारतीय नागरिक होण्याच्या तीन वर्षांपूर्वी आणि त्यांच्याकडे इटालियन नागरिकत्व असतानाही. (Bjp alleges Sonia)
“त्यावेळी, गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या १, सफदरजंग रोड येथे राहत होते. तोपर्यंत, त्या पत्त्यावर नोंदणीकृत मतदार इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मेनका गांधी होते,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
“१९८० मध्ये, नवी दिल्ली संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीत १ जानेवारी १९८० ही पात्रता तारीख म्हणून सुधारणा करण्यात आली. या सुधारणा दरम्यान, सोनिया गांधी यांचे नाव मतदान केंद्र १४५ मध्ये अनुक्रमांक ३८८ वर समाविष्ट करण्यात आले,” असे त्यांनी ‘एक्स’Xवर म्हटले आहे.
हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, असा आरोप मालवीय यांनी केला.
“१९८२ मध्ये झालेल्या गोंधळानंतर, त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले होते, परंतु १९८३ मध्ये ते पुन्हा दिसून आले,” असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवरही टीका केली, त्यांचे आकडे चुकीचे असल्याचे आणि ते खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नवीन मुद्दे शोधत राहते. (Bjp alleges Sonia)