नवी दिल्ली : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबातील ४० सदस्यांचे जबरदस्तीने मुंडण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ओडीसा राज्यातील रायगड जिल्ह्यातील बैगनगुडा गावात ही घटना घडली. (Baiganguda)
बैगनगुडा गावातील तरुणीने शेजारच्या गावातील अनुसुचित जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबधित तरुणीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला. हा विवाह गावातील जातीव्यवस्थेच्या नियमानुसार चुकीचा असल्याने ग्रामस्थानी हे पाऊल उचलले. त्या कुटुंबाला परत त्यांच्या जातीत परतायचे असेल तर पारंपरिक पद्धतीने शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर विवाह केलेल्या तरुणीच्या ४० सदस्यांचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आले. तसेच कोंबड्यांचा आणि बकऱ्यांचा बळी देण्यात आला. गावकऱ्यांच्या दबावामुळे मुलीच्या कुटुंबियांनी सर्व विधी पूर्ण केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त होऊ लागला. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. (Baiganguda)