जमीर काझी : मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली. मयंक रमेश लोहार (वय २२रा. विरार) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पावसामुळे लोकलच्या दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून रोशन सुवर्णा (३०) याने धारदार चाकूने त्याला भोसकले. मंगळवारी रात्री पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर फरारी झालेल्या आरोपी रोशन सुवर्णा याला आज बुधवारी दुपारी कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आला. या रक्तरंजित थरारामुळे मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Youth murdered in Mumbai local train)
लोकलचा दरवाजा बंद करण्यावरुन वाद
या घटनेची माहिती अशी की मंगळवारी रात्री १०.१०च्या सुमारास नालासोपाऱ्याला जाणारी लोकल चर्चगेट येथून सुटली. या जलद लोकलमध्ये मयंक लोहार हा अंधेरी स्टेशनमध्ये चढला. प्रथम श्रेणीच्या मधल्या डब्यात चढल्यानंतर त्याने मुसळधार पावसामुळे पाणी आत येत असल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून इतर प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला होता. एकाला दरवाजा उघडा ठेवायचा होता.तर दुसऱ्याने त्याला विरोध केला.वाद विकोपाला गेल्यानंतर काही जणांनी मिळून रोशन सुवर्णा आरोपी व्यक्तीला मारहाण केली. त्यावर संतापलेल्या रोशनने आपल्या बॅगेतून एका धारदार चाकू काढून त्याने मयंक लोहारवर जोरदार हल्ला चढवला. रक्तबंबाळ होऊन तो जागीच कोसळला. बोरिवली स्टेशन आल्यावर तेथून उतरून निघून गेला.अन्य प्रवास्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर जखमी मयंकला घेऊन रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मध्यरात्री भेट
रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपास यंत्रणांकडे सोपवले आहेत. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई सेंट्रल) आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बोरीवली स्थानकाला भेट दिली. त्यांनी या घटनेचा आढावा घेतला. या प्रकरणाचा तपास जीआरपी करत आहेत. (Youth murdered in Mumbai local train)
लोकलमध्ये हत्येची दुसरी घटना
.पश्चिम रेल्वेवर या वर्षात घडलेली ही दुसरी हत्येची घटना आहे. २४ जानेवारीला मालाड स्टेशनवर लोकलमधून उतरताना झालेल्या वादात प्रा. अलोककुमार सिंग यांची हत्या केली होती. अलोक सिंग यांच्यावरही अशाचप्रकारे धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी काही तासांतच ओंकार शिंदे या हल्लेखोर आरोपीला अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री हा प्रकार घडल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठ प्रश्नचिन्हं उपस्थित झाला आहे. मुंबईत भर गर्दीच्यावेळी घडलेल्या या घटनेनं लोकांमध्ये भीतीचं वातवरण आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Youth murdered in Mumbai local train)