Home » Blog » Asian Athletics : भारताचा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी

Asian Athletics : भारताचा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी

by प्रतिनिधी
0 comments
Asian Athletics

गुमी : भारतीय खेळाडूंनी आशियाई ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये मागील आठ वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आठ सुवर्णांसह २४ पदकांची कमाई केली. याबरोबरच भारताने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चीनखालोखाल दुसरे स्थान पटकावले. (Asian Athletics)

दक्षिण कोरियातील गुमी येथे रंगलेल्या या स्पर्धेमध्ये भारताचा ६० खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. स्पर्धेतील अखेरच्या दिवशी भारताला सुवर्णपदक जिंकता आले नसले, तरी भारत दुसरे स्थान टिकवण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी, २०१७ साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या या द्वैवार्षिक स्पर्धेत यजमान भारत गुणतक्त्यात अग्रस्थानी राहिला होता. त्यानंतर प्रथमच भारताला दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेता आली. या स्पर्धेमध्ये चीनचा संघ १९ सुवर्ण, ९ रौप्य व ४ ब्राँझपदकांसह पहिल्या स्थानावर राहिला. त्याखालोखाल भारतीय खेळाडूंनी ८ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ ब्राँझपदके जिंकली. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या खात्यात ५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १२ ब्राँझपदके आहेत. (Asian Athletics)

या स्पर्धेत भारताच्या नंदिनी आगासारा (महिला – हेप्टेथलॉन), पूजा सिंह (महिला – उंच उडी), ज्योती याराजी (महिला – १०० मी. अडथळा शर्यत), गुलवीर सिंग (पुरुष – ५,००० मी. आणि १०,००० मी. शर्यत), अविनाश साबळे (पुरुष – ३,००० मी. स्टिपलचेस) या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, महिला ४ बाय ४०० मी. रिले आणि मिश्र ४ बाय ४०० मी. रिले या प्रकारांतही भारतीय संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. भारताच्या महिला रिले संघात जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा रजिथा आणि शुभा वेंकटेसन यांचा, तर मिश्र संघात संतोष कुमार, रुपल, विशाल आणि शुभा यांचा समावेश होता. (Asian Athletics)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00