Home » Blog » अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…

अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य घालवून त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला.

by प्रतिनिधी
0 comments

सतीश घाटगे

कोल्हापूर:
भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना जागा जाईल त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे बजावले. घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केले नाही तर आपले सरकार सत्तेवर येणार नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे, या शब्दांत त्यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांची ही भूमिका राज्यातील प्रमुख मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांना आश्वस्त करणारी ठरली आहे.

भाजपचा पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपने पश्चिम महाराष्ट्रात बाजी मारल्याचे मानले जात आहे. विधानसभा तोंडावर असताना आवाडेंच्या प्रवेशाने इचलकरंजीसह हातकणंगले मतदारसंघात भाजपचे बळ वाढणार आहे.

मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य घालवून त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘४०० पार’चा नारा होता. मात्र भाजपला २३८ जागा मिळाल्या. त्यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते नाराज होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम केल्याचे कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा दबदबा वाढला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी घटना बदलणार, आरक्षण जाणार, असा अपप्रचार केला. त्यामुळे आपल्या जागा घटल्या. पण विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला लोकोपयोगी योजनांतून विधानसभा निवडणुकीत उत्तर देण्याचे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लढत नाही. भारताला महासत्ता बनवण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप लढतो, याचा पुनरुच्चारही केला.

उद्धव ठाकरेंवर टीका टाळली

अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकास्त्र सोडले. शरद पवार यांना नेस्तानाबूत केल्यावरच राज्यात भाजपची विजयी मालिका सुरू होणार आहे, असे सांगताना विधानसभा निवडणुकीत शरद पवार हेच लक्ष्य असणार असा सूचक इशारा देण्यासही ते विसरले नाहीत. आगामी हिवाळी अधिवेशनात वफ्फ बोर्डासंबंधी विधेयक मंजूर करणारच. राहुल गांधी यांनी ते रोखून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

पवार, ठाकरे गटाचे कार्यकर्ते फोडा

राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाराज कार्यकर्ते फोडा, असे जाहीर आवाहन शहा यांनी केले. विरोधी पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर भाजप कार्यकर्त्यांचे काय होणार, अशी भीती बाळगू नका. गेली दहा वर्षे आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर विरोधी पक्षातून आलेल्यांना काय देणार, असा प्रश्न त्यांनी केला. शहा यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वीच आवाडे पितापुत्रांना पक्षात प्रवेश दिल्याने शहा यांचे वक्तव्य कोणासाठी, असा प्रश्नही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असावा. आवाडे पितापुत्रांना व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर देऊन पक्षशिस्त, पक्षनिष्ठा कशी बाळगली जाते, असा उदो उदो सभागृहात केला जात असला तरी ही बाब कार्यकर्त्यांना चांगलीच खटकल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला जादा जागा मिळतील, असा विश्वास अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभेतील नॅरेटिव्ह कमी करुन दलित, आदीवासींसाठी विविध योजना राबवल्याने ते मतदार भाजपकडे वळतील. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मते भरभरुन मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महिला प्रामाणिक असतात तर पुरुष बेईमान असतात, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य अंगलट येणार की मतदार ते खिलाडूवृत्तीने स्वीकारतील, ते पहावे लागेल.

एकंदरीतच शहा यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असला तरी जागावाटप झाल्यानंतर तळागाळातील कार्यकर्ता पक्षाचा प्रचार कसा करणार, यावर भाजपचे यश अवलंबून राहणार आहे.
. . . . . .

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00