Home » Blog » Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दुखापत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दुखापत

उजव्या हाताला टाके; पुढील सामन्यात खेळण्याची आशा

by प्रतिनिधी
0 comments
Ajinkya Rahane

नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके घालावे लागणार असून दोन-तीन दिवसांनंतर तो या दुखापतीतून सावरण्याची आशा आहे. (Ajinkya Rahane)

दिल्लीविरुद्धच्या सामन्यामध्ये आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फाफ डुप्लेसिसचा फटका अडवण्याच्या प्रयत्नात शॉर्ट कव्हर येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या रहाणेच्या हातावर चेंडू आदळला. त्याने त्यावेळी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तातडीने मैदान सोडले. त्यानंतर, उर्वरित सामन्यात रहाणे पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी न परतल्याने त्याच्या दुखापतीविषयी शंका उपस्थित करण्यात येत होते. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार व्यंकटेश अय्यरने मैदानावर नेतृत्वाची धुरा सांभाळली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये रहाणेने स्वत: दुखापतीविषयी खुलासा केला. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे त्याने सांगितले. (Ajinkya Rahane)

रहाणेच्या हाताला दोन-तीन टाके घालावे लागणार आहेत. दोन तीन दिवसांच्या दुखापतीनंतर रहाणे या दुखापतीतून सावरेल, अशी माहिती कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू अनुकूल रॉयने दिली. आयपीएलमध्ये कोलकात्याचा पुढील सामना ४ मे रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. या सामन्यात रहाणे खेळेल, अशी आशा कोलकाता संघाला आहे. कोलकात्याने मंगळवारी दिल्लीला १४ धावांनी पराभूत केले. गुणतक्त्यात कोलकात्याचा संघ दहा सामन्यांअखेर ९ गुणांसह सातव्या स्थानी आहे. (Ajinkya Rahane)

सुनील नरेनची विक्रमाशी बरोबरी

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा कोलकात्याचा खेळाडू सुनील नरेनने तीन विकेट घेत एका विक्रमाशी बरोबरी केली. नरेन हा आता टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरीत्या अग्रस्थानी पोहोचला आहे. २०१२ पासून कोलकात्याकडून खेळणाऱ्या नरेनच्या नावावर २०८ विकेट आहेत. त्याने नॉटिंगहॅमशायरतर्फे २०८ विकेट घेणाऱ्या समित पटेलशी बरोबरी केली. या यादीत ख्रिस वूड (हॅम्पशायर, १९९ विकेट) दुसऱ्या, तर लसित मलिंगा (मुंबई इंडियन्स, १९५ विकेट) तिसऱ्या स्थानी आहेत.
हेही वाचा :
वैभवची विक्रमांना गवसणी
बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00