Home » Blog » महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

Maharashtra Election : भाजपची शंभर जणांची पहिली यादी आज; तिसरी आघाडी दीडशे जागा लढवणार

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Election

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप आजच निश्चित करून एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. महायुतीतील भाजपच्या शंभर उमेदवारांची यादी तयार असून, उद्या ती जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिसऱ्या आघाडीने राज्यात दीडशे जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Election)

सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीत दोनशे जागांवर एकमत झाले होते. तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे, यासाठी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आणि इतर नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा दिल्या जातील. जागावाटपात काही जागांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघ जिथे मागील निवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आला होता, ती काँग्रेसकडून ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. भाजपला आणि महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढायचे, असा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. त्यामुळे जागावाटपात तिन्ही पक्षांनी काही जागांवर सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

मुंबईतील ३३ जागांवर एकमत

आजच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पक्षाला एक जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकते, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. (Maharashtra Election)

भाजपची पहिली यादी १०० जणांची असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून या संभाव्य उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महायुती कोणी किती जागा लढवायच्या याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही; मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघात सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे निश्चित आहे. भाजप १२६ जागांवर लढण्याची शक्यता असून यातील पहिल्या शंभर उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाला ९० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलारसह इतर नेत्यांचा समावेश असेल. पहिल्या यादीतील नावे ही अशा मतदारसंघातील असतील, ज्यांची निवडून येण्याची खात्री शंभर टक्के आहे आणि जे मतदारसंघ सुरक्षित आहेत.

भाजपची काल दिल्लीत उमेदवार ठरवण्याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी काही आमदारांना डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सुमार कामगिरी केल्याच्या दावा करत भाजप पक्षश्रेष्ठींकडून काही विद्यमान आमदारांना तिकीटवाटपात डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. भाजप पक्ष नेहमी धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. त्यामुळे भाजप या विधानसभा निवडणुकीतही धक्कातंत्र वापरून अनेक बड्या चेहऱ्यांना तिकीट नाकारणार असल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांची तिकिटे कापली होती.

महाशक्तीचा १५० जागांबाबत निर्णय

दरम्यान, पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत १५० जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णयदेखील घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस यांच्या विरोधातदेखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी आमचे बोलणे सुरू आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. महादेव जानकर आमच्यासोबत येतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असून शरद पवार कसले परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसे काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल त्यांनी विचारला. परिवर्तनाचा अधिकार युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थाने कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 ‘स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार आहोत. आमच्याकडे छोट्या मोठ्या ३० ते ४० संघटना आहेत. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार आहोत.

– माजी खा. संभाजीराजे, राजू शेट्टी, तिसरी आघाडी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00