कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहिले नाहीत, हा देश, घटना आणि जनतेचा अपमान हे अशी टीका केली. अमित शाह हे नालायक आणि अपात्र गृहमंत्री आहेत टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Prithviraj Chavan launches a scathing attack on Amit Shah)
विरोधकांना पळपुटे म्हणणारे स्वत:च घाबरले
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना सभागृहात सामोरे जाण्याची भिती वाटत असल्याची टीका केली. ते शेवटपर्यत सभागृहात आले नाहीत. विरोधकांना पळपुटे म्हणणारे स्वत: सभागृहात जायला घाबरले.गृहमंत्री अमित शाह यांच्याच आदेशानेच दिल्ली आणि बिहारमधील विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्ज आणि दडपशाही झाली. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
जगभरात मोदींचा प्रभाव कमी
पंतप्रधान मोदी यांच्यावरही चव्हाण यांनी टीका केली. मोदींचा जगभरातील प्रभाव कमी होत चालला आहे. ‘तुम्ही पुरस्कार देणार असाल तरच पंतप्रधान मोदी तुमच्या देशाला भेट देतील’ असे परराष्ट्र मंत्रालयाकडून इतर देशांना सांगितले जात असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. २०२९ च्या आगामी लोकसभा निवडणूकीत आपली सत्ता येईल याची खात्री मोदी सरकारला नसल्याने राजकीय पक्ष फोडाफोडीचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Prithviraj Chavan launches a scathing attack on Amit Shah)
बॅकफूटवर गेल्याने मोदी सरकार अस्वस्थ
डिलिमिटेशन बिलाला काँग्रेसचा पूर्ण विरोध असेल. यामुळे प्रगती करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांचे नुकसान होऊन प्रादेशिक समतोल ढासळेल अशी भितीही चव्हाण यांनी व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफूटवर गेल्याने ते कमालीचे अस्वस्थ झाले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारुन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या दबावामुळे झाला होता. शिक्षण आणि परीक्षा पद्धत बदलेल अशी एकही व्यक्ती मला मोदी सरकारमध्ये दिसत नाही.
महाराष्ट्रात ४० टक्के कमिशन खाल्ले जाते
पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकावरही टीका केली. महाराष्ट्रातील प्रकल्पात ४० टक्के कमिशन खाल्ले जात असल्याचा आरोप केला. सध्याच्या सरकारचे लक्ष फक्त मोठ्या रस्त्यांच्या कामांवर आहे असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त दाओसमध्ये जाऊन फक्त करार केले. याला दोन वर्षे उलटली असून राज्यात प्रत्यक्षात किती कंपन्या आल्यास असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्यात उद्योग धंद्याच्या परवानग्यासाठी तीन खिडक्या असल्याने उद्योजक हैराण झालेले आहेत. राज्यकर्त्यांच्या खंडणीखोर आणि लाचेच्या प्रकरणामुळे राज्यात एकही नवीन प्रकल्प येत नाही असा हल्लाही त्यांनी चढवला. (Prithviraj Chavan launches a scathing attack on Amit Shah)