Home » Blog » राहूल गांधी अमित शाह यांच्या राजीनाम्यावर ठाम

राहूल गांधी अमित शाह यांच्या राजीनाम्यावर ठाम

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi firm on Amit Shah's resignation

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली. जोपर्यंत त्यांना जबाबदार धरले जात नाही. तोपर्यंत लढा थांबणार नाही असा इशाराही राहूल गांधींनी दिला आहे.

नीट परीक्षा पेपरफुटीवर कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. तसेच पॅलेट गनचा वापर करण्यात आला. विदयार्थ्यांवरील लाठीमारामुळे देशभर रान पेटल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला. त्यानंतर वीस दिवस उपोषणास बसलेले सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले. तसेच कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले. (Rahul Gandhi firm on Amit Shah’s resignation)

लोकसभेत अमित शाह याचे उत्तर शांतपणे ऐकून घ्यावे

जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेतले असले तरी विद्यार्थी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या प्रश्नांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले आहे. पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असताना लोकसभेचे काम ठप्प झाले आहे. अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गन वापराबाबत उत्तर दिलेले नाही. यावर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजजू यांनी असे म्हटले आहे की, विदयार्थी आंदोलन आणि त्याच्याशी संबधित सर्व मुद्द्यावर अमित शाह उत्तर द्यायला तयार आहेत. ते लोकसभेत उत्तर देण्यासाठी उभे राहतील तेव्हा विरोधकांनी कोणताही अडथळा न आणता शांतपणे म्हणणे ऐकून घ्यावे असे आवाहन रिजिजू यांनी केले आहे. (Rahul Gandhi firm on Amit Shah’s resignation)

पॅलेट गन्सचा वापर करण्याचा आदेश कोणी दिला?

रिजिजू यांच्या आवाहनानंतर राहूल गांधी आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदेत राहूल गांधी म्हणाले, गृहमंत्र्यांचे नेहमीचे भाषण ऐकण्यात विरोधकांना कोणताही रस नाही. विरोधकांना रस आहे तो फक्त २० जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेट गन्सचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले? याचा खुलासा गृहमंत्र्यांनी करावा. जर अमित शाह यांनी हे आदेश दिले असतील तर ते दोषी आहेत. जर त्यांना याची कल्पना नसेल तर ते अकार्यक्षत्र आहेत. अशा दोन्ही परिस्थितीत अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राहूल गांधी यांनी केली.

मोदी, शाह यांच्यात धाडस नाही

गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत येऊन आमच्यासमोर उभे राहण्याचे धाडस नाही. गेल्या १५ दिवसात हे त्यांनी दाखवून दिले आहे अशी टीका राहूल गांधी यांनी केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांमध्ये धाडस नाही. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की पॅलेट गनच्या वापराबाबत आदेश कोणी दिले. आणि त्यांनी जर आदेश दिले नसतील तर गृहमंत्रालयातील कोणी आदेश दिले. हे आम्हाला समजून घ्यायचे आहे अशी भूमिका राहूल गांधी यांनी स्पष्ट केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा

आपल्या भविष्याबबद्दल शांतपणे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यासाठी पॅलेट गन, खिळे ठोकलेल्या काठ्या आणि अश्रुधुरांच्या गोळ्यांच वापर करण्यात आला. पोलिसांनी मुलींनाही मारहाण केली. अल्पवयीन मुलींची हाडे मोडली. या घटनेला वीस दिवस उलटूनही अमित शाह उत्तरे देण्यासाठी संसदेत आलेले नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करत आहोत. जोपर्यंत त्यांना जबाबदार धरले जात नाही. तोपर्यंत लढा थांबणार नाही असा इशाराही राहूल गांधींनी दिला आहे. (Rahul Gandhi firm on Amit Shah’s resignation)

You may also like

error: Content is protected !!