Home » Blog » राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..

राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi's historic speech

राजधानी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण.

 आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अनेक वर्षांपूर्वी माझा एका अतिशय जवळच्या मित्राशी वाद झाला होता. मी त्याला म्हटलं होतं, “तू जे करतो आहेस ते पूर्णपणे अन्यायकारक आहे.” त्यावर त्याचं उत्तर होतं, “जगच अन्यायकारक आहे. त्याची सवय करून घे.”

आज इथं काँग्रेस पक्षाबद्दल जे काही बोललं गेलं, त्याला उत्तर देणं हे माझं काम नाही. उलट माझी भूमिका शिवाच्या त्या परंपरेसारखी आहे, जी सर्व काही आत्मसात करते. नीलकंठ शिवाने जसे विष प्राशन केले, तशी. (Rahul Gandhi’s historic speech)

काँग्रेसवर टीका करा

तुम्हाला माझ्यावर किंवा काँग्रेस पक्षावर आणखी काही टीका करायची असेल, तर आम्ही ती आनंदाने स्वीकारू. हसतमुखाने स्वीकारू. तुम्हाला समाधान मिळावं यासाठी प्रयत्न करू. कारण आमची भूमिका मूलतः तुमच्यापेक्षा वेगळी आहे. मी हे अहंकारानं म्हणत नाही. आपल्यापैकी अनेकांनी सांगितल्याप्रमाणं, आमची भूमिका म्हणजे प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एकत्र आणण्याची आहे. २००४ मध्ये मी पहिली निवडणूक लढवून संसदेत आलो. तेव्हापासून मी काँग्रेसचा खासदार आहे. काँग्रेस पक्षाची रचना भारतातील इतर सर्व पक्षांपेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे. हे मी नम्रतेने सांगतो. का? कारण आधुनिक भारत अस्तित्वात येण्यापूर्वीच हा पक्ष एका प्रतिकार चळवळीच्या स्वरूपात जन्माला आला होता. इतर पक्षांप्रमाणं भारतीय राज्यव्यवस्थेच्या संरक्षणाखाली किंवा तिच्या यंत्रणेचा आधार घेऊन तो उभा राहिलेला नाही. काँग्रेस पक्ष ही अशी प्रतिकार चळवळ आहे, जी प्रत्येक भारतीय समान असल्याच्या विचाराचं रक्षण करते. (Rahul Gandhi’s historic speech)

 तडजोडीपेक्षा मरण पत्करू

आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीला मूलतः विरोध करतो. भाजप किंवा आरएसएससोबत उभं राहण्यापेक्षा, त्यांच्याशी तडजोड करण्यापेक्षा, काँग्रेस पक्ष मरण पत्करेल. ते घडवायचं असेल तर आमच्या माना छाटाव्या लागतील. या देशात लाखो काँग्रेस कार्यकर्ते आहेत, जे म्हणतील — “आमची मान छाटून टाका, पण आम्ही आरएसएससमोर झुकणार नाही.”

मला हे सांगताना खेद होतो की या गटामध्ये एक मोठा गैरसमज आहे. तो म्हणजे समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इतर मित्रपक्षांना असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत वापरलेली राजकीय साधनं आजही प्रभावी ठरतील. ही साधनं कोणत्या काळात चालत होती? तर जेव्हा भारतीय राज्यव्यवस्था सर्वांसाठी समान आणि न्याय्य मैदान उपलब्ध करून देत होती. आज ते मैदान अस्तित्वात नाही. भाजपने सर्व घटनात्मक संस्थांवर नियंत्रण मिळवलंय.भाजप न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकतो. नोकरशाहीवर नियंत्रण ठेवतो. गुप्तचर यंत्रणांवर नियंत्रण ठेवतो. अगदी निवडणूक आयोगावरही त्याचं वर्चस्व आहे.

आम्ही तुमच्यावर प्रेम करतो

 तृणमूल काँग्रेसमधील माझे अनेक मित्र बंगालची निवडणूक सहज जिंकणार असल्याचा विश्वास बाळगत होते. मी त्यांना वारंवार सांगत होतो — “तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत आहात.” मी हे आधी पाहिलंय. गुजरातमध्ये पाहिलंय. मध्य प्रदेशात पाहिलंय. छत्तीसगडमध्ये पाहिलंय. हरियाणात पाहिलंय.आणि महाराष्ट्रातही पाहिलंय. तरीही आपल्यापैकी अनेकांना अजूनही याची पूर्ण जाणीव झालेली नाही.

काँग्रेस हा प्रतिकाराचा पक्ष आहे. त्याला अस्तित्व टिकवण्यासाठी राज्यसंस्थांच्या तटस्थतेची गरज नाही. उलट घटनात्मक संस्थांचा गळा जेवढा घोटला जाईल, त्यांच्यावर जितकं अधिक वर्चस्व मिळवलं जाईल, तितक्या अधिक आक्रमकपणे भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस लढेल.

आपण सर्वजण काँग्रेसच्या मूल्यांवर विश्वास ठेवतो. ती मूल्ये कोणती? सत्य. अहिंसा. आणि करुणा. तुमच्याशी संघर्ष करणं हा माझ्यापुढचा मुख्य प्रश्न नाही. मी वेडा असेन, तरच मी अचानक उठून म्हणेन की, मी माझ्या मित्रांशीच लढणार आहे. तुम्ही आमचे मित्र आहात. आमचे सहकारी आहात. ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो असे लोक आहात. (Rahul Gandhi’s historic speech)

राजकीय साधने निष्प्रभ

 एक गोष्ट समजून घ्या — २०२४ ची निवडणूक आम्ही हरलो नाही. आम्ही ती जिंकली होती. नीतिशजी का गेले, असा प्रश्न विचारला गेला. त्याचे कारण मी नव्हतो. काँग्रेस पक्ष नव्हता. आणि मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत कार्यरत असलेली काही राजकीय साधनेदेखील लवकरच निष्प्रभ होतील. कारण भाजप आणि आरएसएस भारतीय राज्यव्यवस्थेवरील आपली पकड अधिक घट्ट करत आहेत.

काँग्रेसने याच प्रकारचा निर्णय शंभर वर्षांपूर्वी घेतला होता. १९२७ पूर्वी आम्ही एक राजकीय संघटना होतो. ज्या दिवशी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची मागणी केली, त्या दिवसापासून आम्ही प्रतिकार चळवळ झालो. राजकीय पक्ष काम करू शकत नसतील, तर काय काम करू शकते? तर प्रतिकार. प्रतिकार काम करतो. जिथं जिथं आम्ही प्रतिकार केला, तिथं तिथं तो यशस्वी झाला. मी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलंय. मी या देशात चार हजार किलोमीटरची पदयात्रा केली. प्रतिकार काम करतो. त्यासाठी राजकीय यंत्रणेची गरज नाही. नोकरशाहीची गरज नाही. गुप्तचर यंत्रणांची गरज नाही. फक्त एक गोष्ट लागते – अन्यायाला विरोध करण्याची वृत्ती.

“मी अन्याय सहन करणार नाही.” इतकंच. तो एक आत्मा आहे. एक विचार आहे. एक मानसिकता आहे. आणि आपणास आवडो वा न आवडो, आता आपल्याला त्याच मार्गावर जावं लागेल. आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपण एकमेकांशी भांडणार नाही. माध्यमांना आपल्यावर हल्ला करण्याची संधी देणार नाही. आपण प्रतिकार करू.

तुम्हाला वाटतं की पुढची निवडणूक जिंकणं हेच आव्हान आहे. माझं मत वेगळं आहे. पुढची निवडणूक आधीच जिंकली गेलीय.  भारताच्या जनतेमध्ये इतका प्रचंड असंतोष आहे की पुढील निवडणुकीचा निकाल जवळजवळ निश्चित आहे.

 खरा प्रश्न निवडणुकीचा नाही….

 खरा प्रश्न निवडणुकीचा नाही. खरा प्रश्न आहे — आरएसएसने भारतीय राज्ययंत्रणेच्या साधनांवर मिळवलेलं नियंत्रण. तुम्हाला जिंकण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूकच मिळणार नाही, ही समस्या आहे. म्हणूनच आता आपल्याला प्रतिकाराच्या मोडमध्ये जावं लागेल. सीबीएसईमधील प्रश्न असो. नीट परीक्षा असो. भारत जोडो यात्रा असो. प्रतिकार म्हणजे रोज सकाळी उठून स्वतःला विचारणं – “आज मी अन्यायाविरुद्ध कसा उभा राहू शकतो?”आणि मग उभं राहणं. मी तुम्हाला खात्री देतो, ते यशस्वी होईल.

कोणाकडूनही होणारी टीका स्वीकारण्यास मी पूर्णपणे तयार आहे. कारण माझ्यासाठी हे केवळ राजकारण नाही. एक नैतिक कर्तव्य आहे. एक आध्यात्मिक कर्तव्य आहे. म्हणूनच मी तुम्हाला वचन देतो की, या आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी मला जितका अपमान सहन करावा लागेल, तितका मी सहन करेन.

पुढं कसं जायचं?

  ते खूप सोपं आहे. एक गोष्ट आपल्या मनातून काढून टाका. ममता दीदींना ९० टक्के खात्री आहे की त्यांची निवडणूक चोरली गेली. उद्धवजींना ४० टक्के खात्री आहे. तेजस्वीजींनाही काही प्रमाणात शंका आहे. मी मात्र १०० टक्के खात्रीने सांगतो- निवडणुका चोरल्या जात आहेत. याबाबत कोणतीही शंका मनात ठेवू नका.

सोशल मीडियावरील प्रभाव एका आठवड्यात तयार होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. माझे यूट्यूबवर एक कोटी फॉलोअर्स आहेत, तरी माझं खातं पूर्णपणे दाबलं गेलंय.जर तुम्हाला वाटत असेल की, सोशल मीडिया निष्पक्ष आहे किंवा विरोधकांना त्याचा पाठिंबा मिळतो आहे, तर तुम्ही वेगळ्याच वास्तवात जगत आहात.

माध्यमं, सोशल मीडिया, न्यायव्यवस्था, नोकरशाही, गुप्तचर यंत्रणा – संपूर्ण रचना या सरकारला सत्तेत ठेवण्यासाठी काम करत आहे. पण हे सरकार टिकणार नाही. कारण त्यांनी लोकशाही उद्ध्वस्त केलीय. भारतीय जनतेचं भविष्य उद्ध्वस्त केलंय.

 इराणमध्ये जे घडलं, त्यानंतर जे घडणार आहे ते कोणाच्याही नियंत्रणात राहणार नाही. आणि त्यामुळं लोकांना संघटित करण्यासाठी आपल्याला मोठी संधी मिळेल. आपण समन्वयाने काम करत नाही, ही कल्पना मनातून काढून टाका. ही भाजप आणि त्यांच्याशी संबंधित माध्यमांनी पसरवलेली कथा आहे. ती खरी नाही.

आयडिया ऑफ इंडियाचं रक्षण

 आयडिया ऑफ इंडियाचं रक्षण करण्याचा प्रश्न आला, तर मी डीएमकेबाबत १०० टक्के हमी देऊ शकतो. या खोलीतील प्रत्येक जण त्या लढाईत सहभागी असेल. हो, आपापले राजकीय मतभेद आहेत. उदाहरणार्थ, केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांना जाऊन मिठी मार असं कुणी मला सांगितलं, तर मी ते करणार नाही. कारण आमच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे.

पण त्याचवेळी आपल्याला लवचिक राहावं लागेल. आपल्यावर सर्वंकष हल्ला होत आहे. विरोधक कमकुवत आहेत, विस्कळीत आहेत, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.आणखी एक गोष्ट मला जाणवते, आपल्या चर्चांमध्ये अनेकदा निराशेची छटा असते. लोक विचारतात, “भाजपला आपण कसं हरवणार?”मी तुम्हाला सांगतो, जर आपण एकत्र राहिलो आणि प्रतिकार केला, तर त्यांना हरवणं अवघड नाही.

मागच्या निवडणुकीत, इथं उपस्थित असलेल्या कुणालाही भाजपला हरवता येईल असा विश्वास नव्हता. पण आता आपल्यापैकी प्रत्येकानं हा विश्वास बाळगला पाहिजे, की आपण त्यांना हरवू शकतो. त्या विश्वासाने सुरुवात करा. मी तुम्हाला खात्री देतो. राज्यामागून राज्य, निवडणुकीमागून निवडणूक, ते हरत जातील. फसवणूक केली तरी हरतील. नाही केली तरी हरतील. (Rahul Gandhi’s historic speech)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00