Home » Blog » प्रज्ञा सातव काँग्रेसचं कुटुंब सोडून भाजपच्या परिवारात का गेल्या?

प्रज्ञा सातव काँग्रेसचं कुटुंब सोडून भाजपच्या परिवारात का गेल्या?

by विजय चोरमारे
0 comments

विजय चोरमारे

ज्यांना कुणाला वाटतं की, काँग्रेस नेतृत्वाचा दोष आहे त्यामुळं काँग्रेसमधली मंडळी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाकडं बघावं. काँग्रेसनं ज्यांना पद आणि प्रतिष्ठाच दिली असं नव्हे. काँग्रेस नेतृत्वाचं व्यक्तिगत प्रेम आणि जिव्हाळा मिळाला. कठीण काळात आधार मिळाला. त्यासाठी प्रसंगी आपल्याच पक्षातील निष्ठावंतांची नाराजी ओढवून घेतली. अशी मंडळी जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा राजकारण कुठल्या थराला गेलंय, हे लक्षात येतं. (Pradnya Satav joins BJP)

प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षच सोडलेला नाही, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कठीण काळात दिलेला हातही झटकून टाकला आहे. राजीव सातव यांच्या आत्म्याला काय वाटेल वगैरे भाबड्या भंपक चर्चा करण्यात इथं अर्थ नाही. राजकारणात अजूनही थोडाफार चांगुलपणा शिल्लक आहे, असा आशावाद अनेकांना वाटत होता. परंतु राजकारणापुढं सगळी नाती मातीमोल ठरतात. प्रज्ञा सातव यांच्या निर्णयानं राजकारणातल्या चांगुलपणावर अखेरचा घाव घातला आहे. (Pradnya Satav joins BJP)

कुटुंब आणि परिवार (Pradnya Satav joins BJP)

मी भाजपच्या परिवारात सामील होत आहे, असं प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना म्हटलं आहे. भाजपच्या परिवारात आपल्याला सामावून घेतल्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. प्रज्ञा सातव या आधी काँग्रेसच्या कुटुंबात होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या कुटुंबाचा भाग होत्या. त्या कुटुंबाचा उंबरा ओलांडून त्यांनी भाजपचा परिवार जवळ केला आहे. कुटुंब आणि परिवार यात फरक आहे. कुटुंब हे नात्यांवर आधारित असते. रक्ताच्या नात्यांचे असते. तर परिवार हा भावनेवर आधारित असतो. प्रत्येक कुटुंब हे एक परिवार असू शकते. पण प्रत्येक परिवार हा रक्ताचे कुटुंब असेलच असे नाही. तर अशा रितीने रक्ताची नाती तोडून प्रज्ञा सातव या एका मोठ्या परिवारात सामील झाल्या आहेत. (Pradnya Satav joins BJP)

राजीव सातव गांधी कुटुंबाचा भाग

राजीव सातव हे दिल्लीत गांधी कुटुंबाचा भाग होते. ज्यावेळी काँग्रेसमधल्या २३ दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले तेव्हा गांधी कुटुंबासाठी त्यांच्याशी भिडण्याचे धैर्य राजीव सातव यांनी दाखवले होते. राहुल गांधी यांच्या विश्वासातली जी मोजकी माणसं होती, त्यात राजीव सातव यांचं नाव वरच्या बाजूला होतं. सगळा महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्षही ते जाणतो. राजीव सातव यांचं अकाली जाणं हा काँग्रेस पेक्षाही गांधी कुटुंबासाठी मोठा धक्का होता. सातव कुटुंबावर आभाळ कोसळले होते. पण त्यांना आधार देण्याचं काम गांधी कुटुंबानं केलं.

चार महिन्यांत आमदारकी (Pradnya Satav joins BJP)

राजीव सातव यांचं१६ मे २०२१ रोजी कोविड संसर्गातून उद्भवलेल्या गुंतागुंतींमुळं निधन झालं. त्यानंतर चार महिन्यांतच शरद रणपिसे यांच्या निधनानंतर २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. राजीव सातव यांच्या कुटुंबीयांना संसदीय राजकारणात स्थान मिळावे, म्हणून प्रज्ञा सातव यांना त्यांची जागा देण्यात आली. भाजपनं आपला उमेदवार मागं घेतल्यामुळं त्यांची बिनविरोध निवड झाली. (Pradnya Satav joins BJP)

विरोध डावलून पुन्हा संधी

लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीनंतर काही आठवड्यांत विधान परिषदेतील १२ जागा रिक्त झाल्या. त्या भरण्याची प्रक्रिया होत असताना विधान सभेतील संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा येत होती. त्या जागेसाठी पक्षाच्या अनेक निष्ठावंतांमध्ये चुरस होती. अनेकांनी अनेक पातळ्यांवर मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्याचवेळी प्रज्ञा सातव आपल्या मुलासह दिल्लीत आल्या. सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्यामुळे त्यांना त्या भेटल्या. विधान परिषदेवर आपल्याला फक्त दीड वर्षे संधी मिळाली. त्यामुळे आणखी एक संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी सोनिया गांधी यांना केली. राहुल गांधी यांना केली.

लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी होत्या. शिवाय त्यांनी हिंगोलीत पक्षाचं नुकसानच केलं होतं. त्यामुळं पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. तरीसुद्धा राजीव सातव यांच्याशी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन गांधी कुटुंबाने प्रज्ञा सातव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षासाठी काम केलेले, काम करणारे अनेक इच्छूक त्यामुळे नाराज झाले. पक्षाचे राज्यातले नेतेही नाराज झाले. त्याची नेतृत्वाने पर्वा केली नाही.

प्रज्ञा सातव दुस-यांदा आमदार झाल्या. परंतु सोनिया गांधी यांच्या प्रेमाला आपण पात्र नसल्याचेच प्रज्ञा सातव यांनी कृतीतून दाखवून दिले. आमदारकीची पाच वर्षे बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पुन्हा त्याच निवडून जाऊ शकतील. त्यात कोणताही संभ्रम नाही. परंतु सोनिया गांधी यांच्याकडून इतके प्रेम मिळूनही त्या भाजपच्या मोहाला कशा आणि का बळी पडल्या, याचे उत्तर मात्र अनेकांना सापडत नाही.

काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकांचा संपर्क झाला नाही. ज्यांचा संपर्क झाला त्यांना त्यांनी सांगितलं की पक्षातल्या गटबाजीचा त्रास होत असल्यामुळं आपण पक्ष सोडतोय.

पक्षच नाही तिथं गटबाजी कुठून आली?

प्रश्न आला की कुठली गटबाजी? कारण पक्षानं प्रज्ञा सातव यांना आमदार केल्यापासून त्यांच्या त्रासाला कंटाळून पक्षातली अनेक मंडळी आधीच पक्ष सोडून गेली आहेत. यांनी हिंगोलीतली काँग्रेस जवळपास संपवली आहे. गटबाजी करायला कुणी ठेवलेलं नाही. आमदार अमित देशमुख यांनी नांदेडमध्ये लक्ष घालावं, अशी पक्षाची इच्छा होती. त्यांनी तिकडं हिंगोलीत जाऊनव गटबाजी केली म्हणावी, तर अमित देशमुखांना आपल्या मतदारसंघात गटबाजी करायला सवड नसते. ते हिंगोलीत कशाला जातील. (Pradnya Satav joins BJP)

प्रज्ञा सातव यांची किंवा त्यांच्या गटाची काही ताकद नसल्यामुळं त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला काडीचाही उपयोग होणार नाही. सध्या जी पक्षांतरं सुरू आहेत ती स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं लक्षात घेऊन सुरू आहेत. प्रज्ञा सातव यांचा त्यादृष्टिने काहीच फायदा नाही. प्रज्ञा सातव आमदार होत्या, त्यांच्या आमदारकीचा त्यांच्याशिवाय कुणालाच फायदा किंवा तोटा नव्हता. भाजप त्यांना फार मोठे पद काही देणार नाही.

म्हणूनच मग प्रज्ञा सातव यांनी पक्ष का सोडला, असा प्रश्न उरतोच. त्याचं पहिलं कारण म्हणजे गांधी कुटुंबाच्या विश्वासातली व्यक्ती फोडून त्यांना धक्का देणं. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची दावेदारी कमकुवत करणं. (Pradnya Satav joins BJP)

काँग्रेसचा कच्चा लिंबू (Pradnya Satav joins BJP)

काँग्रेसचा विधान परिषदेत कच्चा लिंबू कोण आहे याची चाचपणी भाजपकडून सुरू होती. त्यातून प्रज्ञा सातव यांचं नाव पुढं आलं. मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संपर्क केला. बोलावून घेतलं. आणि भाजप प्रवेशाची ऑफर दिली. सध्याची आमदारकी कायम राखण्याचं आश्वासन दिलं. शिवाय आर्थिक आश्वासनं दिली असणार. ती नेमकी कोणती हे देवेंद्र फडणवीस यांनी खासगीत कुणाजवळ सांगितल्याशिवाय तिस-या कुणाला कळणार नाही. पण फडणवीसांचा गेम यशस्वी झाला. राजीव सातव यांच्या विश्वासातल्या अनेकांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.परंतु ज्यांनी विरोध केला त्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आणि भाजपचं कमळ हाती घेतलं.

विधान परिषदेतील दावेदारी कमकुवत

विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम सांगितला जातो, की दहा टक्के सदस्य असावे लागतात. प्रत्यक्षात तसा काही नियम नसल्याचे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा सत्ताधारी तोच धागा पकडून बसले आहेत. काँग्रेसचे आठ सदस्य होते. त्यानुसार सतेज पाटील यांची दावेदारी होती. तरीसुद्धा भाजपने अत्यंत क्षूद्र राजकारण केले. सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते केले नाही. हिवाळी अधिवेशन तसेच ढकलून नेले. आता तर काँग्रेसची सदस्यसंख्या एकने कमी झाली आहे. म्हणजे रडीचा डाव खेळायला भाजपला आणखी एक कारण मिळालं आहे.

सतेज पाटलांना रोखण्याची व्यूहरचना

भाजपला विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करायची असती तर परवाच केली असती. परंतु सतेज पाटील यांच्या निवडीमध्ये आणखी एक अडचण आल्याचं सांगितले जाते. सतेज पाटील हे आक्रमक नेते आहेत. त्यांचयाकडं संघटन कौशल्य आहे. २०१४ नंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस बळकट केली होती. २०१९च्या विधानसभेला भाजपला शून्यावर आणले होते. त्यांना जर लाल दिवा आणि घटनात्मक पद मिळाले तर ते भाजपला कोल्हापूर-सांगलीमध्ये जड जातील. भाजपच्या कोल्हापूरच्या नेतेमंडळींनी फडणवीस यांना ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली. काँग्रेसला रोखायचं असेल तर सतेज पाटील यांची ताकद वाढता कामा नये. फडणवीसांनी ते ऐकलं. आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलं नाही. अत्यंत घाणेरडं राजकारण केलं.

आता महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊन जातील.

पुढच्या अधिवेशनात दहा टक्क्यांचं तुणतुणं वाजवलं जाईल. आणि विरोधकांवर मेहेरबानी केल्याच्या अविर्भावात विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल. फडणवीस हे कसे उदारमतवादी नेते आहेत, याचे ढोल वाजवले जातील.

प्रज्ञा सातवअसेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भवितव्य नव्हतं. आता त्या पक्ष सोडून गेल्यामुळं जिल्ह्यात काँग्रेस हळुहळू का होईना, पुन्हा उभी राहू शकेल, असं अनेक काँग्रेसजनांना वाटतं. बघूया काय होतं.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00